‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे मत

अमेरिका तेलाबाबत स्वयंपूर्ण झाल्यामुळे जागतिक स्तरावर बदललेली तेलाची आर्थिक समीकरणे आणि इराणवर अमेरिकेने लादलेले आर्थिक र्निबध यामुळे येत्या काळात भारतात इंधन तुटवडा निर्माण होऊन दरवाढीचे मोठे संकट उभे राहणार आहे, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी गुरुवारी व्यक्त केले. दादरमध्ये पार पडलेल्या ‘लोकसत्ता विश्लेषण’ या कार्यक्रमात कुबेर यांनी देशांतर्गत इंधननिर्मिती, पर्यायी ऊर्जानिर्मितीला प्राधान्य देण्याची गरज विशद केली.

‘एनकेजीएसबी को-ऑप बँक लि.’ प्रस्तुत ‘लोकसत्ता विश्लेषण’ हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी दादरच्या वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या सभागृहात पार पडला. ‘तेलाच्या भविष्याशी आपल्या जगण्याचा संबंध काय?’ हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक मोठय़ा संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. तेल असलेल्या आणि नसलेल्या देशांनी तेलावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेले राजकारण उलगडून दाखवताना कुबेर यांनी तेलाचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. त्याच वेळी तेलाच्या अर्थकारणाच्या भविष्याचाही त्यांनी वेध घेतला. ‘‘अमेरिकेने इराणशी असलेले करार रद्द करून त्या देशावर आर्थिक र्निबध लादले आहेत. त्यामुळे भारतात इराणमधून आयात केल्या जाणाऱ्या ३० टक्के तेलावर बंदी येणार आहे. परिणामी, येत्या काळात देशात मोठा इंधन तुटवडा निर्माण होईल,’’ असे ते म्हणाले. तेलाचे दर प्रतिबॅलर १०० डॉलर झाल्यास यावर्षीअखेर इंधन दरवाढीचा भडका उडेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. उंबरठय़ावर आलेले हे तेलसंकट थोपवण्यासाठी देशांतर्गत ऊर्जा आणि इंधननिर्मिती, पुनर्वापर आणि संशोधन असे मार्ग धुंडाळणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

जगातील तेलाचा सुमारे २६ टक्के वाटा एकटय़ाने पिणारा तेलपिपासू अमेरिका गेल्या वर्षी तेलामध्ये स्वयंपूर्ण झाला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत या देशाने हे उद्दिष्ट गाठले. त्यामुळे आता अमेरिका ज्या तेलनिर्मिती करणाऱ्या देशांमध्ये ठाण मांडून बसली होती तेथून ती माघार घेण्याची शक्यता आहे. याचा फटका भारताला बसणार असून २०२० पर्यंत देशाचा संरक्षणावरील खर्च सुमारे दुप्पट होईल, असा सतर्कतेचा इशारा माजी सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी दिला आहे. मात्र याकडे आपण गंभीरतने लक्ष दिलेले नाही, असे कुबेर या वेळी म्हणाले.