‘प्रथम’च्या मदतीने रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

बिहारमधून मुंबईत मजुरीसाठी आणलेल्या १९ बालकांची सुटका करण्याची यशस्वी कारवाई रेल्वे सुरक्षा दलाने सोमवारी पहाटे ठाणे येथे केली. ‘प्रथम’ या सेवाभावी संस्थेच्या बिहारमधील कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे सुरक्षा दल व ‘प्रथम’च्या मुंबई येथील कार्यकर्त्यांनी ही कारवाई केली. बिहारमधून ६० मुले मजुरीसाठी पाठवण्यात आली होती, त्यापैकी काही नाशिक, कल्याण, इगतपुरी येथे उतरल्याने त्यांची सुटका करणे शक्य झाले नाही. १० ते १७ या वयोगटातील १९ बालकांबरोबर त्यांचे काका वा मामा असल्याचे सांगून आलेल्या १४ जणांनाही अटक करण्यात आली.

बिहार तसेच उत्तर प्रदेश या राज्यांतून मुंबईत येणाऱ्या बालकांची संख्या खूप असल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलीस यांनी ‘मुस्कान’ या मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमेंतर्गत अशा वाट चुकलेल्या मुलांना पुन्हा त्यांच्या घरी पोहोचवले जाते. याच कामासाठी ‘प्रथम’ ही सेवाभावी संस्थाही मदत करत असते. बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस या गाडीने ६० बालके मुंबईत येत असून त्यांना मजुरीसाठी मुंबईत आणले जात असल्याची माहिती या संस्थेच्या बिहार  युनिटने मुंबईतील कार्यकर्त्यांना दिली. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधला. या कार्यकर्त्यांच्या साथीने ठाणे स्थानकात कारवाई केली.