बंदोबस्तावरील पोलिसांची भंबेरी; धारावीतील दोन तरुणांना अटक

परदेशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या ताफ्याच्या सुरक्षेची पुरेशी खबरदारी न घेतल्याने काय होते, याचे प्रत्यंतर मुंबई पोलिसांना सोमवारी आले. भारत दौऱ्यावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांच्या वाहनांचा ताफा विमानतळावरून दक्षिण मुंबईकडे निघाला असतानाच भरधाव वेगाने आलेली एक दुचाकी त्या ताफ्यात शिरली. हा प्रकार पाहून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची भंबेरी उडाली. मात्र त्यांच्या इशाऱ्यानंतर वांद्रे पोलिसांनी दोन्ही दुचाकीस्वारांना बाजूला घेऊन त्यांना अटक केली.

हा प्रसंग सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास वांद्रे  पूर्वेकडील कलानगर चौक ते सागरी सेतूदरम्यान घडला. वांद्रे पोलिसांनी दुचाकीस्वारांना ताब्यात घेत कसून चौकशी केली. मात्र मोकळा रस्ता पाहून भरधाव वेगाने जाण्याचा प्रयत्न या दुचाकीस्वारांचा होता, एवढेच या चौकशीतून निष्पन्न झाले.

फकरुद्दीन महोम्मद हनीफ अन्सारी (२०) आणि महोम्मद अन्सारी (१८) अशी या दुचाकीस्वारांची नावे आहेत. हे दोघे धारावीचे रहिवासी असून त्यांना बेदरकारपणे दुचाकी चालवणे, सरकारी कामात अडथळा या कलमान्वये अटक केल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

कॅनडाचे पंतप्रधान त्रुडो आपल्या कुटुंबासोबत एक आठवडा भारतभेटीवर आहेत. दिल्लीत एक दिवस वास्तव्य केल्यानंतर सोमवारी सायंकाळी ते कुटुंबासह मुंबई विमानतळावर उतरले. तेथून ते दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलच्या दिशेने निघाले. या अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांच्या बंदोबस्तासाठी सुमारे १५ ते २० पोलीस वाहनांचा ताफा सज्ज होता. शिवाय विमानतळ ते हॉटेल या मार्गावर स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. ताफा पश्चिम द्रुतगती मार्गावरून निघाला. कलानगर चौकाजवळ ताफा असताना फकरुद्दीन आणि अन्सारी यांची भरधाव वेगात असलेली दुचाकी ताफ्यात शिरली आणि ताफ्यासोबत वेगाने पुढे सरकू लागली. ते पाहून त्रुडो यांच्या मागेपुढे असलेल्या पोलीस वाहनांमधील अधिकाऱ्यांची एकच भंबेरी उडाली. वायरलेसवरून तातडीने पुढल्या पोलीस ठाण्यांना वर्दी देण्यात आली. ताफ्यातील अधिकारी आणि वांद्रे पोलिसांनी पाच मिनिटांमध्ये या दोघांना बाजूला काढले आणि पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात या दोघांकडे कसून चौकशी करण्यात आली. मात्र त्यातून संशयास्पद असे काहीच पुढे नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्याने लोकसत्ताला दिली. मंगळवारी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत धाडले, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, त्रुडो यांचा ताफा पुढे निघून गेल्यानंतर मोकळ्या रस्त्यावरून आरोपी दुचाकीस्वार भरधाव वेगात जात होते. ते ताफ्याच्या मागून भरधाव जात आहेत हे पाहून त्यांना तेथेच अडविण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात येत आहे.