केवळ चारचाकी वाहनांनाच प्रवेश मिळत असल्याने सर्वसामान्यांत नाराजी

गेल्या अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला चुनाभट्टी-बीकेसी उड्डाणपूल रविवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा उड्डाणपूल खुला झाल्याने पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. मात्र या उड्डाणपुलावरून दुचाकी, रिक्षा आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याने  या वाहनांच्या चालकांमध्ये नाराजी आहे.

ठाणे आणि नवी मुंबई परिसरातून वांद्रेच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना शीव रेल्वे स्थानक आणि धारावी परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या वाहनांना तात्काळ वांद्रे परिसरात जाता यावे यासाठी एमएमआरडीएने बीकेसी कनेक्टर हा उन्नत मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०३ कोटी रुपये खर्च करून एमएमआरडीएने हा उड्डाणपुल तयार केला. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पूर्ण काम होऊन देखील हा मार्ग खुला करण्यात येत नव्हता. त्यामुळे ऐन दिवाळीत राष्ट्रवादीने या ठिकाणी आंदोलन करत, तात्काळ हा मार्ग खुला करण्याची मागणी केली होती. त्यानुसार काही दिवसांचा वेळ घेत १० नोव्हेंबर पासून एमएमआरडीएने हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. मात्र अपघात होण्याचे कारण समोर ठेवत, वाहतूक पोलीस आणि एमएमआरडीएने या मार्गावरून दुचाकी, रिक्षा आणि अवजड वाहनांना बंदी घातली आहे. तशा प्रकारचे फलक एमएमआरडीएने या पुलाच्या प्रवेशद्वारावर लावले आहेत. मात्र या मार्गामुळे मोठय़ा प्रमाणात वेळ वाचत असल्याने रिक्षा आणि दुचाकींना येथून प्रवेश मिळावा

अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. याबाबत चेंबूर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण तेजाळे यांच्याशी संपर्क साधला असता, एमएमआरडीएकडून हे फलक लावले असल्याने आम्ही दुचाकी, रिक्षा आणि अवजड वाहनांना या पुलावरून जाण्यास बंदी घातली असल्याचे त्यांनी सांगितले.

बसच्या वाहतुकीसाठी बेस्टचे प्रयत्न

या पुलावरून बस वाहतूक करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच प्रायोगिक तत्त्वावर या मार्गावरून एक बसमार्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. बेस्टच्या वाहतूक अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक घेण्यात आली. सध्या बेस्ट उपक्रमाकडे बसगाडय़ांची कमतरता असल्याने नवीन बसमार्ग सुरू करणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या एव्हरार्ड नगरहून सायन धारावी मार्गे कला नगर वांद्रय़ाकडे  जाणारे बसमार्ग या मार्गावरून वळवणे शक्य असल्याने या पर्यायांचा विचार करण्यात येणार आहे. हा उन्नत मार्ग नवीन असल्याने सध्या फक्त सात बंगला यारी मार्ग त तुर्भे या  मार्गावरील ३५५ क्रमांकाची बस या उन्नत मार्गावरून चालवण्याचा बेस्टचा विचार आहे. मात्र त्याकरिता बेस्टला एमएमआरडीएची परवानगी घ्यावी लागणार आहे. याबाबत चाचपणी सुरू आहे.