18 January 2019

News Flash

मुंबईत धक्कादायक प्रकार, भरदिवसा दुचाकीस्वाराने महिलेच्या पोटात घातली लाथ; फेसबुकवर व्हायरल

महिलेने फेसबुकच्या माध्यमातून आपल्यासोबत घडलेल्या या धक्कादायक प्रसंगाची माहिती देत पोलिसांनी दिवसा गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे

मुंबईत एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं असून भरदिवसा एका दुचाकिस्वाराने महिलेच्या पोटात लाथ घालून पळ काढला. बोरिवलीत ही घटना घडली आहे. महिला आपल्या मुलीला शाळेतून घेऊन घरी जात असताना हा प्रकार घडला. महिलेने फेसबुकच्या माध्यमातून आपल्यासोबत घडलेल्या या धक्कादायक प्रसंगाची माहिती देत पोलिसांनी दिवसा गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. जवळपास १०० जणांनी महिलेची पोस्ट शेअर केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याची माहिती दिली आहे.

‘आमचं घर शाळेपासून जवळ असल्याने नेहमी चालत जातो. दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी आम्ही आयसी कॉलनीजवळ पोहोचलो तेव्हा एक दुचाकीस्वार समोरुन येत असल्याचं पाहिलं. तो वेगाने येत असल्याने माझं त्याच्याकडे लक्ष होतं, कारण माझ्यासोबत माझी मुलगीही होती. जवळ येताच त्याने वेग कमी केला आणि आपला पाय बाहेर काढला. त्याने अत्यंत जोरात माझ्या पोटात लाथ घातली. मला लाथ खूप जोरात बसल्याने प्रचंड वेदना झाल्या. पण जोपर्यंत मी काही करणार त्याने तेथून पळ काढला’, अशी माहिती बिसवाप्रिया चक्रवर्ती यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये दिली आहे.

पुढे त्यांनी सांगितलं की, ‘एका रिक्षाचालकाने आणि दुचाकीस्वाराने हे सर्व पाहिलं आणि मला मदत करण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचालकाने त्याचा पाठलाग केला, पण काही वेळाने तो परत आला. त्याला पकडू शकलो नसल्याचं त्याने सांगितलं. त्याचा हेतू माझी पर्स चोरी करायचा होता की, छेड काढायचा हे माहित नाही’.

बिसवाप्रिया चक्रवर्ती यांनी १०० नंबरवर फोन केला असता थोड्याच वेळात पोलीस आले. त्यांनी दुचाकीचा नंबरप्लेट पाहिला का अशी विचारणा केली. ‘मी त्यांना सांगितलं की, मी नंबर पाहू शकेन अशा परिस्थितीत नव्हते. त्यांनी जवळपास असलेल्या ठिकाणांवरही चौकशी केली. पण त्याठिकाणी कुठेच सीसीटीव्ही नव्हते’, अशी माहिती बिसवाप्रिया चक्रवर्ती यांनी दिली आहे. बिसवाप्रिया चक्रवर्ती यांनी यासंबंधी पोलीस तक्रार केली आहे.

‘आम्ही दुचाकीस्वाराचा शोध घेण्यासाठी दोन पोलीस पथकं तयार केली आहे. काही ठिकाणी सीसीटीव्ही असून त्यामध्ये काही कैद झालं आहे का याची पाहणी करत आहोत’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोख जाधव यांनी दिली आहे. बिसवाप्रिया चक्रवर्ती यांनी आपण दुचाकीस्वाराचा चेहरा पाहिला असून, पुन्हा एकदा पाहिल्यावर त्याला ओळखू शकतो असं सांगितलं आहे.

First Published on June 14, 2018 9:42 am

Web Title: biker hit woman and ran away in borivali facebook post went viral