१० दिवसांत १८ दुचाकीस्वारांवर कारवाई; २० टक्के पोलिसांचाही समावेश

दक्षिण मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पूर्व मुक्त मार्गावर दुचाकीस्वारांनी मोटारचालक आणि वाहतूक पोलिसांना भंडावून सोडले आहे. एकीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वारांमुळे इतर वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहेच, त्याचबरोबरीने वाहतूकीचे नियमन करणाऱ्या पोलिस आणि खुद्द दुचाकीस्वाराच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे. ऑगस्ट महिन्याच्या १० दिवसांमध्ये १८ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत १६३ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली असून विशेष म्हणजे या कारवाईत पकडण्यात आलेल्या दुचाकीस्वारांमध्ये ३० ते ४० पोलिसांचाही समावेश आहे.

उपनगरांना शहराशी जोडण्यासाठी जून २०१३ मध्ये पूर्व मुक्त मार्गाची उभारणी करण्यात आली. १६.८ किलोमीटर लांबीच्या हा मार्ग शिवाजी नगर जंक्शन ते पी. डिमेलो मार्ग इथपर्यंत आहे. या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांना ६० किमी प्रतितास इतकी वेगमर्यादा आहे तर दुचाकीस्वारांना या मार्गावर जाण्यास पूर्णपणे बंदी आहे. मात्र, हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला झाल्यापासून तिथे दुचाकीस्वारांचा राबता कायम आहे. मुक्त मार्गावरुन जाणारी चारचाकी वाहने वेगात असतात, त्यातच दुचाकीस्वार या मार्गावरुन जात असताना त्यांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते, त्यातही अनेकदा दुचाकीस्वार संपूर्ण कुटुंबाला घेऊन जाताना निदर्शनास येते, त्यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता असते, असे एका वाहतूक पोलिसाने सांगितले.

अनेक दुचाकीस्वार पोलिसांनी पकडल्यानंतर आपण मुक्त मार्गाच्या आजूबाजूला राहात असल्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात. काहीजण हुज्जतही घालतात, रहिवासाचा पत्ता दाखवून मुक्त मार्गावरुन जवळ पडत असताना लांब वळसा घालून का जायचे, असा प्रश्नही करतात. अशा हुज्जतखोर दुचाकीस्वारांमुळे पोलिसांच्या त्रासात भर पडत आहे.

२० टक्के पोलिसांनाही दंड

वाहतूक पोलिस दुचाकीस्वारांना थांबवून त्यांच्यावर निष्काळजपणे गाडी चालवणे या कलमाअंतर्गत मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत ६०० रुपयांचा दंड आकारते. पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत २० टक्के पोलिसांवरही दंड ठोठावण्यात आला आहे. काही पोलिसांवर विनाहेल्मेट दुचाकी चालविल्याचा दुहेरी दंड आकारण्यात येत असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. अनेक पोलीस दक्षिण मुंबईतून घरी जाताना जवळचा मार्ग म्हणून या मार्गाचा वापर करतात पण, कारवाई दरम्यान त्यांचीही गय करण्यात येत नाहीये.

पूर्व मुक्त मार्गावर दुचाकीस्वारांना परवानगी नसूनही अनेक जण पोलिसांची नजर चुकवून तर कधी जोडमार्गावरुन त्यावर येतात, त्यांच्यामुळे इतर वाहनचालक आणि दुचाकीस्वारांच्या जीवालाही धोका निर्माण होतो, वाहतूक पोलिस अशा दुचाकीस्वारांना रोखण्यासाठी सातत्याने जागोजागी नाकाबंदी तसेच गस्त घालून कारवाई करत असते. पूर्व मुक्त मार्ग दुचाकीस्वारांसाठी नसून त्यांनी इतर मार्गाचा वापर करावा.

– अनिल कुंभारे, वाहतूक पोलीस उपायुक्त (शहरे)

free-way-chart