‘शॉर्टकट’ घेण्याचा ‘बेकायदा’ प्रयत्न वेळखाऊ ठरणार
वेळ वाचवण्यासाठी आणि वेगात गाडी चालवण्यासाठी पूर्व मुक्त मार्गावर नियम मोडून दुचाकी चालवणाऱ्यांना यापुढे हा मार्ग वेळखाऊ ठरण्याची शक्यता आहे. या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकीस्वारांना दंड आकारण्यासोबतच त्यांचे अर्धा तास समुपदेश करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे पूर्व मुक्त मार्गावरील ‘शॉर्टकट’ दुचाकीस्वारांना ‘लाँगकट’ ठरण्याची शक्यता आहे.
पूर्व मुक्त मार्गावर दुचाकीस्वारांना मनाई करण्यात आली आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या चारचाकी वाहनांची संख्या जास्त असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकींना येथे प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, तरीही दुचाकीस्वार या मार्गाचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. बीपीटी मार्गाऐवजी मुक्त मार्गाचा वापर केल्याने किमान ३० मिनिटे वाचतात. त्यामुळे दुचाकीस्वार हा ‘शॉर्टकट’ वापरतात. मात्र, त्यामुळे या मार्गावर दुचाकींचे अपघात होऊ लागले आहेत. सोमवारी भरधाव वेगाने दुचाकी हाकणाऱ्या एका स्वाराचा वडाळा येथे अपघातात मृत्यू झाला होता.
या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी आता दुचाकीस्वारांना दंड आकारण्यासोबतच त्यांना हा मार्ग ‘वेळखाऊ’ कसा वाटेल, या दृष्टीने पावले उचलली आहेत. या मार्गावरून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वारांना थांबवून अर्धा तास त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. या ३० मिनिटांत त्यांना वाहतूकीचे नियम आणि मुक्त मार्गावर दुचाकी चालविण्याचे धोके या विषयी मार्गदर्शन केले जाईल.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या १० दिवसांतच १८ दुचाकीस्वारांनी मुक्त मार्गावर प्रवेश केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यातच, अनेक दुचाकीस्वार अत्यंत भरधाव जात असल्याने मुक्त मार्गावर प्रवेश नसूनही मोकळा रस्ता असल्याने अनेक दुचाकीस्वार शॉर्टकट म्हणून या मार्गाचा वापर करतात. अशा दुचाकीस्वारांवर मोटार वाहन कायद्यानुसार बेदरकारपणे वाहन चालविण्याचा ६०० रुपयांचा दंडही आकारला जातो. मात्र, तरीही हे दुचाकीस्वार बधत नसल्याने त्यांचे समुपदेशन करण्यास वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. जो वेळ वाचविण्यासाठी दुचाकीस्वार या मार्गावर येत असल्याने किमान अर्धा ते एक तास त्यांना वाहतूक नियम आणि मुक्त मार्गावरील धोके याविषयी आम्ही समुपदेशन करत आहोत, असे वडाळा वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. मुक्त मार्गावर पकडले गेलो तर दंडाबरोबरच समुपदेशनातही वेळ जात असल्याचे कळाल्यानंतर तरी दुचाकीस्वार या मार्गाकडे फिरकणार नाही, अशी वाहतूक पोलिसांची अपेक्षा आहे.

दुचाकीस्वाराचा मृत्यू
मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या आदित्य कुमार तिवारी (२०वर्षे) या तरुणाचा सोमवारी सायंकाळी मुक्त मार्गावर अपघात झाला. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आदित्यने दुचाकी घेऊन मुक्त मार्गावर प्रवेश केला होता. भरधाव वेगात असताना नियंत्रण गमावल्याने वडाळा (पूर्व) जवळ त्याची दुचाकी वीजेच्या खांब्याला धडकली. अपघातात आदित्य गंभीर जखमी झाला. त्याला केईएम रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.