नमिता धुरी

आपला जेमतेम उरलेला वाचक वर्ग वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या नियतकालिकांच्या व्यवसायाला आता टाळेबंदीमुळे मोठा फटका बसला आहे. छापील अंक कधी निघेल याची शाश्वती नसल्याने काही नियतकालिकांनी आपल्या वर्गणीदारांना ई-अंक पाठवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ई-अंकातून आर्थिक उत्पन्न मिळत नसल्याने नियतकालिकांच्या व्यवसायात अनिश्चिततेचे वातावरण आहे.

गेली दहा वर्षे मनोरंजन विश्वातील आशय मांडणाऱ्या ‘तारांगण’ मासिकाचा शेवटचा अंक मार्चमध्ये निघाला. एप्रिल-मेचा अंक निघू शकला नाही. जूनचीही खात्री नाही. ‘टाळेबंदी संपली तरी जोपर्यंत सिनेमे प्रदर्शित होत नाहीत तोपर्यंत जाहिराती मिळणार नाहीत. काही लेख संकेतस्थळावर प्रकाशित करण्यास सुरुवात केली आहे. पण पुस्तकांप्रमाणे मासिकांचा ई-अंक पैसे भरून वाचला जात नाही. शिवाय ई-अंकामुळे छापील अंकाचे महत्त्व कमी होते. त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होते आहे. टाळेबंदी अशीच सुरू राहिली तर नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी ई-अंक काढण्याचा विचार करू’, असे तारांगणचे प्रकाशक मंदार जोशी यांनी सांगितले.

‘छपाई बंद असल्याने छापील अंकासाठी दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागू शकते. अंक छापला तरी टपालसेवा सुरू झाल्याशिवाय त्याचे वितरण शक्य नाही. शिवाय सध्या वाचकांचे प्राधान्यक्रम बदलल्याने अंक बाजारात आला तरी त्याच्या विक्रीबाबत साशंकता असेल. एकूण पाचशे नोंदणीकृत व्यावसायिक नियतकालिके  आहेत. प्रत्येक नियतकालिकासाठी काम करणारे कर्मचारी, छपाई इत्यादी गोष्टी मिळून एका अंकासाठी किमान लाखभर रुपये खर्च येतो. गेले तीन महिने व्यवसाय बंद आहे. पुढच्या तीन महिन्यांतही तो सुरू होण्याची शाश्वती नाही. या कालावधीत नियतकालिकांच्या व्यवसायाचे साधारण २० ते २५ कोटींचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने आर्थिक साहाय्य करावे’, अशी मागणी ‘मराठी संपादक-प्रकाशक नियतकालिक असोसिएशन’चे अध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी यांनी केली. ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाने फेब्रुवारीपासून ऑनलाइन मजकूर प्रकाशित करण्यास सुरुवात केली होती. परंतु ऑनलाइन आणि छापील मासिकातील मजकूर वेगळा असल्याने वर्गणीदारांना मुदत वाढवून दिली जाणार आहे. तीस वर्षांत प्रथमच ही परिस्थिती ओढवली आहे. कार्यालयाचे भाडे, लेखक-चित्रकारांचे मानधन, इत्यादींसाठी खर्च करावा लागत असल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे संपादिका गीताली विनायक मंदाकिनी सांगतात.

‘मुलांचे मासिक’ या मासिकाचा बराचसा वाचकवर्ग ग्रामीण भागातील असल्याने ई-अंक गरसोयीचा ठरतो. शिवाय ऑनलाइन आणि छापील अंकाच्या विक्रीत फरक पडत असल्याने आर्थिक नुकसान होते आहे. मात्र हे उपजीविके चे साधन नसल्याने नुकसान सहन करू शकतो’, असे संपादक जयंत मोडक यांनी सांगितले.

दीर्घ लेख पीडीएफमध्ये वाचणे गैरसोयीचे

आतापर्यंत ‘साधना’ साप्ताहिकाच्या आठ अंकांची छपाई झालेली नाही. दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणून वर्गणीदारांना पीडीएफ पाठवतो. ७० ते ७५ टक्के वर्गणीदारांपर्यंत पोहोचत आहोत. जे तंत्रस्नेही नाहीत अशांना टाळेबंदीनंतर पुस्तके  भेट देऊ, शक्य झाल्यास छापील अंक पाठवू, असे संपादक विनोद शिरसाट यांनी सांगितले. प्रतिकू ल परिस्थितीतही पीडीएफ स्वरूपात अंक प्राप्त होत असल्याने वाचक समाधानी आहेत. मात्र, दीर्घ लेख पीडीएफमध्ये वाचणे शक्य होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. टाळेबंदीत अंकांची छपाई बंद असली तरीही भविष्यातील अंकांची पायाभरणी करण्याचे काम सुरू असल्याचे शिरसाट सांगतात.