11 August 2020

News Flash

‘बिगरप्लास्टिक’च्या नावाखाली पुन्हा तेच!

बायोडिग्रेडेबल पिशव्यांसाठीचा कच्चा माल २५० रुपये प्रति किलो दराने विकला जातो.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : सहज विघटनीय (कम्पोस्टेबल) असलेल्या पर्यावरणपूरक पिशव्याच वापरण्याची मुभा नव्या प्लास्टिकबंदी कायद्याने दिली असताना बंदी असलेल्या जैवविघटनीय (बायोडिग्रेडेबल) पिशव्यांचीच ‘बिगरप्लास्टिक’ म्हणून सर्रास विक्री सुरू आहे.

जैवविघटनीय पिशव्या  सहज विघटनीय पिशव्यांपेक्षा वेगळ्या असतात. या पिशव्यांचे सहा ते आठ महिन्यांत बारीक तुकडय़ात विघटन होत असले तरी त्यांची माती होत नसल्याने त्यांच्यावर बंदी कायम आहे. परंतु, कम्पोस्टेबल आणि बायोडिग्रेडेबलबाबत सर्वसामान्यांमधील अज्ञानाचा फायदा घेऊन बंदी असलेल्या या पिशव्या सर्रास विकल्या जात आहेत.

सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, थर्माकॉलच्या सजावटीच्या वस्तू, एकदा वापरून फेकून दिली जाणारी प्लास्टिक तसेच थर्माकॉलची भांडी यावर २३ जूनपासून बंदी घालण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठी दुकाने, किरकोळ विक्रेते आणि उपाहारगृहांमधून १०० टक्के बायोडिग्रेडेबल असे लिहिलेल्या पिशव्यांमधून ग्राहकांना माल वा खाद्यपदार्थ देण्यास सुरुवात झाली आहे. या पिशव्यांचे तीन महिन्यांत विघटन होते, असा दावा दुकानदारांकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात या पिशव्यांवरही राज्य सरकारने बंदी घातली आहे.

त्यामुळे जैवविघटनीय (बायोडिग्रेडेबल) असे लिहिलेल्या पिशव्यांवरही कारवाई केली जाईल, असे मुंबई पालिकेच्या बाजार विभागाच्या व प्लास्टिकबंदीविरोधी पथकाच्या प्रमुख संगीता हसनाळे यांनी सांगितले. मात्र कागदी किंवा कापडी पिशव्यांपेक्षा पावसात या जैवविघटनशीलतेचा दावा करणाऱ्या प्लास्टिक पिशव्या हमखास दिल्या जात आहेत. त्यामुळे या पिशव्यांची मागणी वाढली आहे. सर्वसाधारण प्लास्टिकच्या पिशव्या तयार करण्यासाठी ७० रुपये किलो दराने कच्चा माल दिला जातो, तर बायोडिग्रेडेबल पिशव्यांसाठीचा कच्चा माल २५० रुपये प्रति किलो दराने विकला जातो. तरीही अनेक दुकानदार या महागडय़ा पिशव्या घेत आहेत.

कम्पोस्टेबल पिशव्यांबाबतही अनेक शंका आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एप्रिल २०१८ पर्यंत देशभरातील केवळ तीन उत्पादकांना कम्पोस्टेबल पिशव्या तयार करण्याची आणि दोनच कंपन्यांना विक्रीची परवानगी दिली आहे. उत्पादकांपैकी एक कंपनी मुंबईत असून इतर दोन कंपन्या चेन्नई आणि बंगळुरू येथे आहेत. विक्री परवानगी असलेली एक कंपनी मुंबईत तर दुसरी हरयाणात आहे. मात्र या पिशव्यांसाठी कच्चा माल  पुरवणाऱ्यांपैकी अ‍ॅडव्हान्स बायो मटेरियल प्रा. लि. या कंपनीच्या शैलेश जाधव यांनी बेल्जिअम येथील विन्कोटकडून ओके कम्पोस्ट हे प्रमाणपत्र मिळाल्याचा दावा केला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणपत्र मिळण्यासाठी एक वर्ष लागत असल्याने ते प्रमाणपत्र मिळवले नसून प्रत्यक्ष पिशव्या तयार करणाऱ्या कंपन्यांना ते घ्यावे लागते, असे त्यांचे म्हणणे आहे.

कारवाई..

मुंबई महानगरपालिकेने २३ जूनपासून आतापर्यंत ६२,७१४ दुकानांची तपासणी करून प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्याने ५७९ दुकानांकडून २८ लाख ९५ हजार रुपये दंड वसूल केला. या दरम्यान १९३७ किलो प्लास्टिक गोळा करण्यात आले. यातील १९ लाख ६५ हजार दंड पहिल्या आठवडय़ात गोळा करण्यात आला होता.

कम्पोस्टेबल पिशव्या

कम्पोस्टेबल पिशवीमध्ये पेट्रोजन्य पदार्थ नसतात. ती मका तसेच इतर अन्नघटकांपासून तयार केली जाते. ही पिशवी मातीत ठेवली असता त्याचे पूर्ण विघटन होऊन कार्बनडायऑक्साइड, पाणी तसेच इतर घटक तयार होतात व या मातीतून वनस्पती उगवू शकते.

बायोडिग्रेडेबल पिशव्या

जैवविघटनीय प्लास्टिकच्या पिशव्या तयार करण्यासाठी पेट्रोजन्य पदार्थच वापरले जातात. सर्वसाधारण प्लास्टिक हे शेकडो वर्षे त्याच स्थितीत राहते तर जैवविघटनीय प्लास्टिकचे सहा ते आठ महिन्यांत बारीक तुकडे होतात, मात्र ते मातीचे घटक होत नाहीत, त्यातून झाड उगवत नाही.

बायोडिग्रेडेबल पिशव्यांचे तीन महिन्यांत विघटन होते, असा दावा दुकानदारांकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात या पिशव्यांवरही राज्य सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे जैवविघटनीय (बायोडिग्रेडेबल) असे लिहिलेल्या पिशव्यांवरही कारवाई केली जाईल.

– संगीता हसनाळे, प्रमुख, मुंबई महापालिका प्लास्टिकविरोधी पथक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 3:41 am

Web Title: biodegradable plastic bag sales are continuing in mumbai
Next Stories
1 धर्मनिरपेक्ष आघाडीसाठी काँग्रेसचाच पुढाकार हवा
2 रेल्वेचे जल-वे
3 चोरटय़ा संकेतस्थळांची आर्थिक, तांत्रिक नाकाबंदी
Just Now!
X