अभिनेता सलमान खानच्या चित्रपट कारकीर्दीचा प्रवास, त्याचे वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्य यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चरित्राचे याच महिन्यात त्याच्या जन्मदिनी प्रकाशन होणार आहे. ‘बीईंग सलमान’ असे या पुस्तकाचे नाव असून, पेंग्विन इंडिया ते प्रकाशित केले आहे. दिल्लीस्थित पत्रकार जसिम खान यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
१९८८ मध्ये सलमान खानने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. आतापर्यंतच्या कारकीर्दीत त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामध्ये अगदी सुरुवातीच्या मैने प्यार किया, हम आपके है कोन इथपासून ते अगदी अलीकडील काळातील दबंग, किक, बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो या चित्रपटांचा समावेश आहे.
सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या काही घटनाही बऱ्याच चर्चिल्या गेल्या आहेत. चिंकारा शिकार प्रकरण किंवा हिट अॅंड रन प्रकरणात त्याला आरोपी म्हणून न्यायालयात उभे करण्यात आले होते. हिट अॅंड रन प्रकरणात त्याला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरविले असून, पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली. गेल्या काही वर्षांपासून अनेक सामाजिक कामांसाठी सलमान खानची ‘बीईंग ह्युमन’ सामाजिक संस्था साहाय्य करते आहे. या कामामुळे त्याच्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.