करोनासंबंधित कचऱ्यामुळे ४० टनांची वाढ

मुंबई : करोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्याचबरोबर इतर वैद्यकीय उपचारांचे प्रमाण वाढल्यानंतर एका दिवसाला राज्यातील एकूण जैववैद्यकीय कचरा सप्टेंबर महिन्यात १०० टनापलीकडे पोहचला आहे. करोनापूर्व काळातील नेहमीच्या जैववैद्यकीय कचऱ्यापेक्षा सुमारे ४० टन अधिक कचरा सध्या तयार होत आहे.

करोना रुग्णांची संख्या वाढू लागली तसे एप्रिल महिन्यातील दिवसाला ६.९६ टन कोव्हिड जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण मे महिन्यात दुप्पटीहून अधिक झाले. जून महिन्यात ते ३०.३७ टनावर पोहचले. दरम्यानच्या काळात इतर वैद्यकीय उपचार, शष्टद्धr(२२९क्रियांचे प्रमाण कमी झाल्याने इतर जैववैद्यकीय कचरा नेहमीपेक्षा अध्र्यावर (३१.१२ टन) आला. पण इतर वैद्यकीय उपचार वाढू लागल्यावर जुलैमध्ये इतर जैववैद्यकीय कचरा पुन्हा करोनापूर्व काळा इतकाच म्हणजे ६० टनापर्यंत पोहचून एकूण जैववैद्यकीय कचरा ९० टनाच्या आसपास पोहचला.

जैववैद्यकीय कचऱ्यातील वैयक्तिक सुरक्षा साधनांच्या (पीपीई किट) वाढत्या प्रमाणामुळे तसेच अलगीकरण केंद्रातील इतर अजैववैद्यकीय सामग्रीची सरमिसळ होत असल्याने कचरा विल्हेवाट केंद्र आणि यंत्रसामग्रीवर अनावश्यक ताण येत असे. ऑगस्टमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुधारित नियमावली लागू केल्यानंतर हा ताण कमी झाला आहे. मात्र एकू णच वैद्यकीय उपचारातील सुरक्षासाधनांच्या वाढत्या वापरामुळे एकूण जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण सप्टेंबरमध्ये १०३.८५ टनावर पोहचले आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून ई-पासचे निर्बंध रद्द केल्यानंतर गेल्या आठ दिवसांत करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर इतर वैद्यकीय उपचार वाढत असून एकूण जैववैद्यकीय कचरा वाढला आहे. ‘राज्यातील दोन घातक कचरा निर्मूलन केंद्राची क्षमता पुरेशी असल्याने सध्या विल्हेवाट लावण्याबाबत अडचण नसल्याचे,’ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. अमर सुपाते यांनी सांगितले. जैववैद्यकीय कचरा सध्या भस्मीकरणाद्वारे नष्ट केला जातो. वाढत्या कचऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यासंदर्भात अन्य काही पर्याय काढता येतील याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाशी चर्चा सुरू असून, त्यांच्याकडून सुधारणा आल्या तर त्यानुसार कार्यवाही केली जाईल असे त्यांनी नमूद केले.

तळोजा केंद्रावर मदार

सप्टेंबर महिन्यात ८ तारखेस राज्यात कोविड जैववैद्यकीय कचरा ४९ टन असून, इतर जैववैद्यकीय कचरा ५४.८५ टन इतका आहे. राज्यातील जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट केंद्रांची एकूण क्षमता ही सुमारे ६० टन इतकी आहे. मात्र वाढत्या जैववैद्यकीय कचऱ्याचा ताण केंद्रावर येऊ लागल्यानंतर कोविड जैववैद्यकीय कचरा तळोजा येथील घातक कचरा विल्हेवाट केंद्रावर पाठविण्यात येऊ लागला. राज्यातील काही केंद्रांना क्षमतावाढीची परवानगी यापूर्वीच दिली असली तरी टाळेबंदीमुळे अनेक कचरा विल्हेवाट केंद्रांच्या विस्तारीकरणाचे काम रखडले आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे दोन विल्हेवाट केंद्रे असून, त्यांचे विस्तारीकरण गेल्या सहा महिन्यांपासून रखडल्याचे केंद्रचालकांनी सांगितले. त्यामुळे तेथील कोविड जैववैद्यकीय कचरा अतिरिक्त ठरत असून तो रोज तळोजा येथील केंद्रात पाठवावा लागत आहे.