करोनाबाधित तसेच संशयितांच्या उपचारांदरम्यान निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये राज्यात दोन दिवसांत दुपटीने वाढ झाली. करोनासंदर्भातील सर्व जैववैद्यकीय कचऱ्याची स्वतंत्रपणे भस्मीकरणाद्वारे विल्हेवाट लावली जात असून, १ एप्रिलच्या तुलनेत ३ एप्रिलच्या जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण दुप्पट झाले.

करोनाबाधित आणि संशयितांच्या उपचारांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण होऊ लागले. त्याचबरोबर या माध्यमातून निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याच्या निर्मूलनासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या धर्तीवर राज्य मंडळाने २० मार्चला स्वतंत्र नियमावली जारी केली. त्यानुसार करोना उपचारांदरम्यानचा सर्व जैववैद्यकीय कचरा हा स्वतंत्रपणे जमा करणे आणि स्वतंत्रपणे भस्मीकरणाद्वारे विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सध्या राज्यात ३० ठिकाणी सुविधा असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी अमित सुपाते यांनी दिली. नियमितपणे वैद्यकीय कचऱ्याचे संकलन आणि भस्मीकरण करणाऱ्या यंत्रणाच हे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या टप्प्यात करोनासंबधित कचऱ्याचे संकलन हे इतर जैववैद्यकीय कचऱ्याबरोबरच केले जात होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या नियमावलीत इतर यंत्रणांनी सुचविल्यानुसार दुरुस्ती करून २६ मार्चपासून राज्यात करोनासंबंधित कचऱ्याचे संकलन आणि भस्मीकरण स्वतंत्रपणे केले जाऊ लागले.

वैद्यकीय कचऱ्यासंदर्भात सर्व नोंदी स्वतंत्रपणे ठेवण्यात येत असून त्यासाठी अंतर्गत वापराचे पोर्टलदेखील तयार करण्यात आले आहे. सध्या राज्यात वैद्यकीय कचऱ्याच्या निर्मूलनासाठी ३० केंद्रे असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. करोनासंदर्भातील कचऱ्याचे भस्मीकरण करण्यासाठी सध्याची यंत्रणा सक्षम असल्याचे त्यांनी नमूद केले.

* मुंबई शहरातील कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक – १४४८.६० किलो,

* मुंबई उपनगर ५७३.६१ किलो

* पुणे ३३६.१६  ल्ल ठाणे २४२.४७

* सांगली आणि इतर १००.९०

कचरा संकलन नियम

करोनासंदर्भातील सर्व जैववैद्यकीय कचरा हा पिवळ्या रंगाच्या बॅगेत स्वतंत्रपणे ‘कोव्हीड १९ कचरा’ असा उल्लेख करून संकलित करणे बंधनकारक आहे. हा जैववैद्यकीय कचरा वाहून नेण्यासाठी स्वतंत्र वाहन यंत्रणा बंधनकारक आहे. रुग्णालये, अलगीकरण कक्षात जैववैद्यकीय कचरा एकत्र करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व साधनांचे र्निजतुकीकरण करावे. हा कचरा वाहून नेणाऱ्या वाहनाचेदेखील र्निजतुकीकरण करावे. कचरा वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक संरक्षण सामग्रीचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच घरातच अलगीकरणामध्ये असलेल्या संशयितांनी जैववैद्यकीय कचरा संकलन केंद्राशी संपर्क साधून तो कचरा त्यांच्याकडे सुपूर्द करावा.