सभागृहात केवळ स्वाक्षरीपुरती हजेरी लावणाऱ्या नगरसेवकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी भाजपकडून करण्यात आली.

पालिका सभागृहात अनेक वेळा महत्त्वाचे प्रस्ताव, ठराव मंजूर केले जातात. यासाठी नगरसेवकांची पुरेशी संख्या असणे गरजेचे असते. मात्र अनेक नगरसेवक सभागृहाच्या बैठकांना उपस्थित राहात नाहीत. सभागृहाच्या बैठकीस केवळ हजेरीची स्वाक्षरी करण्यापुरते उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना महत्त्वाच्या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी व्हिप काढावा लागत आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना-भाजपने केवळ स्वाक्षरी करून पळणाऱ्या नगरसेवकांना वेसण घालण्याची तयारी सुरू केली आहे. बैठकीसाठी येणाऱ्या नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली. या मागणीला शिवसेनेने तात्काळ पाठिंबा दिला. त्यामुळे दांडीबहाद्दर आणि पळकुटय़ा नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी भाजप आणि शिवसेनेचे नेते नगरसेवकांवर बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करीत असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी या मागणीला विरोध केला.