नायर रुग्णालयातील प्रयोग; रुग्णालय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीचीच

मुंबई: संगणकीय हजेरीला (बायोमेट्रिक) रुग्णालय कर्मचाऱ्यांनी जोरदार विरोध केलेला असला तरी रुग्णालय कर्मचाऱ्यांची त्यातून सुटका होणार नाही. संसर्ग होऊ नये म्हणून फक्त बोटाने हजेरी नोंदवण्याऐवजी कॅमेरामध्ये चेहरा पाहून संगणकावर (फेस रिडर) हजेरी नोंदवली जाणार आहे. पालिकेच्या विद्युत व यांत्रिकी विभागाने तशी तयारी केली असून नायर रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर ही हजेरी सुरू होणार आहे.

पालिकेच्या कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवण्यासाठी पालिका प्रशासनाने संगणकीय हजेरी पुन्हा सुरू केली. मात्र त्याला कर्मचारी संघटनांनी विरोध केल्यानंतर संगणकीय हजेरीचा निर्णय मागे घेण्यात आला. मात्र रुग्णालय कर्मचाऱ्यांना संगणकीय हजेरी बंधनकारक करण्यात आली. त्यामुळे रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. रुग्णालयात संसर्गाचा धोका अधिक असतो, त्यामुळे इथे संगणकीय हजेरी नको, असा पवित्रा रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी घेतला आहे. सोमवारी १३ जुलै रोजी ठिय्या आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. तरीही रुग्णालय कर्मचाऱ्यांना संगणकीय हजेरी लावण्याचा प्रशासनाचा विचार आहे. मात्र यंत्रावर बोट दाबून (थंब इम्प्रेशन) हजेरी नोंदवताना संसर्गाचा धोका असल्यामुळे वेगळ्या पद्धतीची पण संगणकीय हजेरी आणण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयाला शुक्रवारी महापौरांनी भेट दिली आणि करोना कक्षाची पाहणी केली. या पाहणीत काही वॉर्डमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी अनुपस्थित असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले होते. या बाबीची महापौरांनी गंभीर दखल घेऊन महापालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक यांची तातडीने शनिवारी बैठक घेतली. यावेळी आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारासू उपस्थित होते.

महापौरांनी यावेळी बायोमेट्रिक प्रणालीबाबत सर्व अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक यांच्या सूचना ऐकून घेतल्या. कोणत्याही प्रकारची संगणकीय हजेरी असली तरी चालेल. परंतु ती असली पाहिजे, असे मत व्यक्त केले. यावर  कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी चेहरा ओळख दर्शविणारी प्रणाली उपयुक्त असल्याचे महापौरांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाने सर्व तांत्रिक मुद्दय़ांची तज्ज्ञ मंडळीद्वारे तपासणी करून  प्रायोगिक स्तरावर नायर रुग्णालयामध्ये ही यंत्रणा बसवावी, असे निर्देश महापौरांनी दिले. यावेळी कर्मचाऱ्यांची  उपस्थिती नोंदविण्यासाठी चेहरा ओळख दर्शविणाऱ्या प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले.

बेस्ट बसची मागणी

रेल्वेच्या जलद थांब्यावरून रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना ने-आण करण्याकरिता बेस्ट बसची व्यवस्था करण्याची मागणी सर्वानी यावेळी केली. याबाबत बेस्टचे महाव्यवस्थापक यांच्यासोबत चर्चा करून हा मुद्दा निकाली काढण्याचे निर्देश महापौरांनी अतिरिक्त आयुक्त यांना यावेळी दिले. त्याचप्रमाणे या सर्व प्रश्नांबाबत विविध युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा करणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचे प्रमाण लक्षात घेता, सर्वच रुग्णालयांनी जास्तीत जास्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.