News Flash

उन्हाच्या चटक्याचा पक्ष्यांना फटका

उन्हाचा चटका बसू लागल्याने शहरी भागातील पक्ष्यांचे जीवनमान धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली आहे.

वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने फक्त माणसेच हवालदिल होत नसून याचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे. मात्र, याचे पक्ष्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होत असून वेळीच पाणी न मिळाल्याने अनेक पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या झळा वाढू लागल्या की पक्षी आजारी पडण्याचे प्रमाण वाढते, या वर्षी मात्र मार्च महिन्यापासूनच उन्हाचा चटका बसू लागल्याने शहरी भागातील पक्ष्यांचे जीवनमान धोक्यात आल्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.

उन्हाळा सुरू झाल्यावर सामान्य माणसापासून प्राण्यापर्यंत सगळ्यांनाच चटके बसू लागल्याने प्रत्येक जण पाणी अथवा थंडाव्याच्या शोधात असतो. अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे माणसाच्या या गरजा तात्काळ पूर्ण होतात. मात्र, प्राणी व पक्षी यांना नैसर्गिक स्रोतांमधूनच या गरजा भागवाव्या लागत असल्याने त्यांच्यापुढे अडचणी निर्माण होतात. यात उन्हाचा जास्त फटका पक्ष्यांना बसत असल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे उडताना अचानक खाली पडणे, तारांमध्ये अडकणे अथवा मृत्यू होणे असे गंभीर प्रकार पक्ष्यांबाबत घडतात. याबाबत सांगताना बाई साखरबाई दिनशॉ पेटिट प्राण्यांच्या रुग्णालयाचे सचिव जे. सी. खन्ना म्हणाले की, शहरातील हिरवळ व पाण्याचे स्रोत कमी होत असून त्याचा पक्ष्यांच्या घरटय़ांवर परिणाम होत आहे. तसेच नागरिक त्यांच्या घरात अथवा इमारतीत होणारी पक्ष्यांची घरटी काढून टाकतात, त्यामुळे आधीच झाडावर घरटे करू न शकल्याने हे पक्षी बाहेर येतात व निवाऱ्याचा पर्याय न मिळाल्याने उन्हाला बळी पडतात. तसेच एखाद्या प्राणिमित्राने ठेवलेले पाणी पक्षी खराब करतील या उद्देशाने अनेक जण ते पाणी उपडे करतात, त्यामुळेही पक्ष्यांना पाणी मिळत नाही. असेही खन्ना म्हणाले.

मार्चपासूनच पक्षी रुग्णालयात

दरवर्षी रुग्णालयात एप्रिलपासून पक्षी उपचारासाठी दाखल होतात. मात्र, या वर्षी मार्चपासूनच ऊन वाढल्याने पक्षी रुग्णालयात उपचारासाठी येण्यास सुरुवात झाली आहे. यात कबूतर, कोकिळा, घुबड, पोपट, सी-गल्स, घार या पक्ष्यांचा समावेश आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा जास्त पक्ष्यांचे जीवनमान यंदा खालावण्याची भीती खन्ना यांनी व्यक्त केली. या पक्ष्यांना ग्लुकोज व प्रतिजैविकांचे औषध देऊन उडण्यास सक्षम झाल्यास रात्री नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कबूतर व घारी अधिक आजारी

दरवर्षी ५००-६०० पक्ष्यांवर या काळात उपचार करण्यात येतात. या वर्षी ७०० हून अधिक पक्षी दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी उपचार घेण्यात कबुतरांची संख्या अधिक असून ६० ते ६५ टक्के कबुतरे, ३०-३५ टक्क्यांमध्ये घुबड, पोपट, सी-गल्स, कोकिळा उपचारांसाठी येतात. यात घारींची संख्या सर्वाधिक आहे.

पक्ष्यांसाठी काय कराल?

घर अथवा इमारतीवर पाण्याची भांडी ठेवण्यात यावीत. तसेच या पाण्यात ग्लुकोज टाकल्याने पक्ष्यांना आधार मिळू शकेल. ही पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत तसेच त्यातील पाणी काही काळाने बदलणे आवश्यक आहे. तसेच या काळात इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नका व शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2016 5:27 am

Web Title: birds are affected due to heavy hit
टॅग : Birds
Next Stories
1 मराठी चित्रकाराचे इटलीत प्रदर्शन
2  ‘परस्पर संमतीने लैंगिक संबंध म्हणजे बलात्कार नव्हे’
3 पाकिस्तानशी संबंध नकोतच – उद्धव ठाकरे
Just Now!
X