News Flash

१५ वर्षांनी पुन्हा एकदा पक्षी गणना

किमान १५ मिनिटे किंवा साधारण तासभर वेळ देऊ शकणाऱ्या कोणत्याही पक्षिमित्राला या गणनेत सहभागी होता येईल.

१५ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा देशभरात पक्षीगणना

घरात राहणाऱ्या माणसांची गणना करणेही जिथे कठीण जाते, तेथे आभाळात निरंतर घिरटय़ा घालणाऱ्या पक्ष्यांना कसे मोजायचे..पण आपल्या आजूबाजूला सतत अस्तित्व दाखवून देणाऱ्या, परिसंस्थेचा अविभाज्य भाग असलेल्या पक्ष्यांची माहिती करून घ्यायची असेल तर गणना आवश्यकच आहे. पक्षिमित्रांसाठी एकाच वेळी अत्यंत आवडीचे व आव्हानात्मक असलेले हे काम बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने करण्याचे ठरवले असून १५ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा देशभरात पक्षीगणना होत आहे. किमान १५ मिनिटे किंवा साधारण तासभर वेळ देऊ शकणाऱ्या कोणत्याही पक्षिमित्राला या गणनेत सहभागी होता येईल.
देशात पक्षीनिरीक्षण व संशोधनाचा पाया रचणारे डॉ. सलीम अली यांचा १२ नोव्हेंबर हा वाढदिवस. यानंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी म्हणजे १५ नोव्हेंबरला ही गणना होईल. पुढील प्रत्येक वर्षी १२ नोव्हेंबरनंतरच्या पहिल्या रविवारी ही गणना केली जाईल. एकाच दिवशी देशभरातील विविध ठिकाणी पक्षीनिरीक्षण करून देशातील पक्ष्यांच्या प्रजाती, त्यांची वाढलेली किंवा घटलेली निवासस्थाने, त्यांच्या लकबी, दुर्मीळ पक्षी आदींची माहिती मिळवता येईल. पक्ष्यांबाबत भारतात फारच कमी संशोधन झाले असून या पक्षीगणनेच्या माध्यमातून पक्षीप्रेमींना प्रोत्साहन देणे व पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे असा दुहेरी हेतू साध्य होईल.
पक्षीगणनेतील सहभागासाठी..
* पक्षीगणनेत कोणीही सहभागी होऊ शकते.
* तुम्ही देशभरात कुठेही पक्षीनिरीक्षण करू शकता.
* यासाठी किमान १५ मिनिटे देणे आवश्यक आहे.
* साधारण एक तास हा योग्य वेळ ठरतो.
* एकाच दिवसात अनेक ठिकाणीही पक्षीगणना करता येईल. फक्त प्रत्येक ठिकाणी पाहिलेल्या पक्ष्यांची वेगवेगळी यादी देणे आवश्यक आहे.
* आढळलेल्या पक्ष्यांची प्रजाती, संख्या, सवयी, त्यांचे निवास आदी बाबतीतील तपशील www.ebird.org/india या संकेतस्थळावर द्यायचे आहेत.
* देशभरातून आलेली माहिती एकत्रित करून त्याचे विश्लेषण पक्षीगणनेच्या स्वरूपात प्रसिद्ध केले जाईल.
* अधिक माहिती http://ebird.org/content/india/getting-started/ या संकेतस्थळ पानावर मिळेल. ०९००४९२४७३१/९०२२१८६७४४ या क्रमांकावरही माहिती घेता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 4:57 am

Web Title: birds count again after 15 years
टॅग : Birds
Next Stories
1 ‘स्वानंदी’ ऋतुजा बागवेची ‘सुवर्णसफर’
2 १९ लाख घरांसाठी जादा चटई क्षेत्रफळ
3 औंध संगीत अमृतमहोत्सव अभिजात स्वरांत रंगला
Just Now!
X