वर्तणुकीनुसार होणारे आवाजातील बदल टिपणे सहजशक्य

सुहास जोशी, लोकसत्ता

मुंबई : आपल्याच अवतीभोवती असलेले पण एरवी शहरी कोलाहलात हरवून गेलेले पक्षीविश्व टाळेबंदीत सर्वसामान्यांना कानांना व नेत्रांना सुख देण्याबरोबर पक्षीनिरीक्षकांना अभ्यासाच्या नोंदीही मिळवून देत आहे. तांबट पक्ष्याचा विशिष्ट टुक-टुक आवाज, कावळा, चिमणीसारख्या नेहमीच्या पक्ष्यांच्या आवाजात होणारा बदल, एरवी जंगलात कडय़ांवर घरटे करणारा पण टाळेबंदीत एखाद्या उंच इमारतीच्या कोपऱ्यात घरटे बांधणारा ससाणा अशी निरीक्षणाची पर्वणी अभ्यासक साधत आहेत.

टाळेबंदीच्या काळात जंगल, माळरान, नदीकाठी पक्षीनिरीक्षण करणे शक्य नसले तरी, शहरातील पक्षी निरीक्षणासाठी अनेक हौशी, तसेच पक्षी अभ्यासकांकडून पक्षी निरीक्षणासाठी अनोखे मार्ग अवलंबत आहेत. त्याचबरोबर शहरी पक्ष्यांचे वर्तणुकीनुसार बदलणारे आवाजदेखील अगदी सहजपणे ध्वनिमुद्रित करणे शक्य होत आहे.

‘पक्ष्यांच्या आवाजात वर्तणुकीनुसार बदल होत असतात. एखाद्या जंगलात वगैरे हे सर्व सहज टिपता येते. पण ते शहरात शक्य नसते. मात्र सध्या असे बदल केवळ ऐकताच नाही तर ध्वनिमुद्रितदेखील करता येत आहे,’ असे पक्षीतज्ज्ञ राजू कसंबे यांनी सांगितले. प्रियराधनाचा आवाज, मांजर, कुत्रे जवळ आल्याचा आवाज, माणूस दिसल्यावर होणारा बदल, घरटय़ाची सीमा अधोरेखित करणारा आवाज असे आवाजातील अनेक बदल या काळात राजू कसंबे यांनी टिपले आहेत. त्याचबरोबर पहाटे दिवस सुरू होताना आणि सायंकाळी संपल्यावर होणारा कलरवदेखील (रुस्टिंग) या काळात टिपता आला. हाच काळ पक्ष्यांच्या प्रियराधनेचा असून नर मादीच्या जोडय़ा जुळणे, त्यांचा विशिष्ट नाच, गाणे आणि घरटी बांधणे अशा विशिष्ट बदलांना सहज टिपणे शक्य असल्याचे पक्षीतज्ज्ञ आनंद पेंढारकर सांगतात. या काळातील आवाज हे विशेष आवाज म्हणून ओळखले जातात. एरवी शहराच्या गदारोळात ते बुडून जातात. सध्या ते सहज कानी पडत असल्याचे ते नमूद करतात. गेल्या महिनाभरात पक्षीनिरीक्षकांच्या अशा नोंदीमध्ये वाढ झाल्याचे पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर म्हणााले.

टाळेबंदीत शहरातील पक्षी

एरवीचा गदारोळ थांबणे आणि इतर व्यवधाने नसण्यामुळे कायमच आपल्याभोवती असलेल्या पक्षीविश्वाची जाणीव गेल्या महिनाभरात विशेषत्वाने होत असल्याचे पक्षी अभ्यासक सांगतात. कावळा, चिमणी, कबूतर असे पक्षी तर एरवीदेखील दिसतात. पण सुभग, दयाळ, होला, बुलबुल, तांबट, गव्हाणी घुबड, शिंपी, ससाणा अशी निरीक्षणे या काळात अभ्यासकांनी नोंदवली आहेत.

पक्षी निरीक्षणावर मराठीतून वेबसंवाद

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेने पक्षीप्रेमींसाठी खास मराठीतून वेबसंवादाचे आयोजन या काळात केले आहे. या संवादाला २०० हून अधिकांचा प्रतिसाद लाभला आहे. यामध्ये पुढील काळात एक दिवसाआड एक वेबसंवाद होणार आहे. डॉ. अनिल पिंपळापुरे, डॉ. राजू कसंबे, डॉ. जयंत वडतकर, संदीप साखरे आणि मनोज बिंड यांचे मार्गदर्शन या सत्रांमध्ये होईल. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या फेसबुक पेजवर यामध्ये सहभागी होण्याबाबत अधिक माहिती उपलब्ध आहे.