केंद्रीय औषध नियंत्रक विभागाचे आदेश

गर्भपाताच्या गोळ्यांचा वापर हा वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय सुविधांच्या उपलब्धतेतच करावा, अशा सूचना औषधांच्या पाकिटावर लावणे बंधनकारक असल्याचे आदेश केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने राज्य अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत. गर्भपाताच्या गोळ्यांच्या अवैध वापरावर र्निबध आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

गर्भपातासाठी कायदेशीररीत्या मिझोप्रोस्टॉल आणि मिफेप्रिस्टोन यांच्या एकत्रित मिश्रणाच्या औषधांच्या वापराला डिसेंबर २००८ साली केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने परवानगी दिलेली आहे. त्या वेळी वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार औषधांचा वापर वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करावा, अशी सूचना पाकिटावर असणे बंधनकारक असल्याचेही ठरविण्यात आले होते; परंतु याची अंमलबजावणी  योग्य रीतीने होत नसून याचा अवैधरीत्या वापर होत आहे. तेव्हा याला चाप लावण्यासाठी म्हणून घाऊक औषध विक्रेत्यांनी याचा पुरवठा केवळ नोंदणीकृत गर्भपात केंद्रांनाच करावा असे औषध सल्लागार समितीने नियंत्रक विभागाला सुचविले होते. तसेच या पाकिटांवर सूचनाही छापणे बंधनकारक असून याची अंमलबजावणी योग्य रीतीने करण्याचे निर्देश देणे आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले होते.