लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘कोयना’ या अंध बिबटय़ा मादीचे पालकत्व स्विकारत मुंबईचे उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांची कन्या वेदांगी बोरीकर हिने अनोख्या पध्दतीने आपला वाढदिवस साजरा केला. वन्य प्राण्याचे पालकत्व स्विकारत बोरीकर कुटुंबाने समाजासाठी आदर्श घालून दिला.

दोन्ही डोळ्यांना दुखापत झाल्याने ९ वर्षीय ‘कोयना’ मादीला २०१२ ला कोयना अभयारण्यातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटय़ा निवारा केंद्रात दाखल करण्यात आले होते. बोरीकर कुटुंबाने सलग दुसऱ्या वर्षी ‘कोयना’ मादीला दत्तल घेतले असून त्यांनी नुकतेच राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक आणि संचालक असलेल्या मल्लिकार्जुन यांना धनादेश सुपूर्द केला. ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जगातील दाट लोकवस्ती असणाऱ्या मुंबई आणि ठाणे या शहरांच्या मध्ये वसले आहे. उद्यानाचे संवर्धन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, वन्यप्राण्याचे पालकत्व स्विकारून त्यांनी हातभार लावावा’, असे आवाहन मिलींद बोरीकर यांनी केले.

‘शासनाच्या धोरणानुसार दत्तक मूल्य स्विकारून एका वर्षांकरिता वन्य प्राण्यांचे पालकत्व स्विकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नुसार सिंहांचे ३ लाख रुपये, वाघाचे ३.१० लाख रुपये, बिबटय़ांना १.२० लाख रुपये, वाघाटीसाठी ५० हजार रुपये, नीलगायीसाठी ३० हजार रुपये, चितळसाठी २० हजार रुपये मूल्य आहे. संस्था आणि खासगी कंपन्यांनी सामाजिक जबाबादारी म्हणून या योजनेत सहभागी व्हावे,’ असे आवाहन राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकार्जुन यांनी केले.