इमारत धोकादायक झाल्याचे सांगत ती रिकामी करण्यासाठी आलेल्या मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांबरोबर माझगाव ताडवाडी भागातील बीआयटी चाळ १४, १५ आणि १६च्या रहिवाशांचा सोमवारी सायंकाळी संघर्ष झाला.
एकीकडे पालिकेने इमारती रिकाम्या करून माहुल गाव येथे पुनर्वसन करण्याची तयारी दाखवली असून दुसरीकडे रहिवाशांनी इतर इमारतींतील रहिवाशांप्रमाणे माझगाव परिसरातच पुनर्वसन करून द्यावे, अशी भूमिका घेतली आहे. बुधवारी शीघ्र कृती दलाच्या जवानांच्या साहाय्याने रहिवाशांना घरी रिकामे करण्यास सांगण्यात येणार असून रहिवाशांनी विरोध करण्याची भूमिका घेतल्याने बुधवारी पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
माझगावच्या ताडवाडी भागात बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या (बीआयटी) १६ इमारती आहेत. २०१३ मध्ये यातील काही इमारतींना धोकादायक असल्याचे पत्र देण्यात आले होते. परंतु, इमारती धोकादायक नसल्याचा दावा करत रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर, या इमारतींचा पुनर्विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील होते.
तुलनेने अधिक धोकादायक असलेल्या इमारत क्र. १२ आणि १३ पाडून त्यातील रहिवाशांना त्याच परिसरात संक्रमण शिबीर बांधून देण्यात आले आहे. इमारत क्र. १४, १५, १६ धोकादायक झाल्या असून त्यातील एकूण २४० रहिवाशांना घरे रिकामे करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेकडून या रहिवाशांना ऐनवेळी देण्यात आले आहेत.
सोमवारी सायंकाळी भायखळा पोलीस आणि पालिकेचे अधिकारी या इमारत परिसरात दाखल झाले. कुठल्याही परिस्थितीत घरे रिकामी करा, असा तगादा त्यांनी लावला होता, मुलाबाळांच्या शाळा सुरू होत असताना ऐन वेळी आम्ही कुठे जाणार असा प्रश्न रहिवासी विचारतात. सोमवारी पोलिसांनी रहिवाशांना केलेल्या धक्काबुक्कीत शांता पालजी या ज्येष्ठ महिलेला मार लागला.
याच परिसरात राहिलेले आणि आता लोकप्रतिनिधी असलेली एकही व्यक्की न आल्याने रहिवाशांमध्ये कमालीचा संताप आहे. माहुल गावात राहायला गेल्यावर मुलांचे शिक्षण, कामावर जाणे या सर्वाचीच अडचण होत असल्याने माझगावमध्येच पुनर्वसन करून द्यावे, अशी मागणी रहिवासी करत आहेत. बुधवारी शीघ्र कृती दलाचे जवान घरे रिकामे करून घेण्यासाठी येणार असल्याने प्रशासनाशी पुन्हा संघर्ष होणार असून कुठल्याही परिस्थितीत घरे न सोडण्याची भूमिका रहिवाशांनी घेतली आहे.