* स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत भाजप आक्रमक * प्रश्नांच्या सरबत्तीपुढे सत्ताधारी निरुत्तर

मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत भाजपच्या पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. यात काँग्रेससह अन्य पक्षांच्या सदस्यांनीही भाजपला साथ केली. प्रशासनाने सादर केलेल्या दोन प्रस्तावांत त्रुटी काढून राखून ठेवण्यास, तर एक प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यास स्थायी समिती अध्यक्षांना भाग पाडले. काँग्रेसच्या मागणीमुळे पदोन्नतीच्या एका प्रस्तावावर मतदान घ्यावे लागले.

पालिका निवडणुकीनंतर स्थायी समितीची पहिली बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये भाजपच्या पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. बहुतेक सर्वच प्रस्तावांवर ऊहापोह करीत भाजप गटनेते मनोज कोटक, नगरसेवक प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर यांनी त्यातील त्रुटींवर प्रकाशझोत टाकला. भाजपच्या पहारेकऱ्यांच्या प्रश्नांच्या भडिमारामुळे पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेची कोंडी झाली. परिमंडळ ६ मधील रस्त्यालगतच्या गटारांतून काढलेला गाळ उचलणे आणि वाहून नेण्याचे काम कंत्राटदाराला देण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात आला होता. हा गाळ मुंबईबाहेर नेमका कुठे टाकणार याची माहिती द्यावी आणि तेथे स्थायी समिती सदस्यांचा दौरा आयोजित करण्याची मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली. पावसाळा जवळ आल्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पण भाजपच्या मागणीमुळे स्थायी समिती सदस्यांचा दौरा आयोजित करण्याचे आश्वासन स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना द्यावे लागले.

भंडारवाडा टेकडी जलाशय येथील सदोष झडपा बदण्याबाबत सादर केलेल्या प्रस्तावातील त्रुटींवर सभागृह नेते यशवंत जाधव यांनी प्रकाशझोत टाकला. ही संधी साधत भाजप गटनेते मनोज कोटक आणि नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी या प्रस्तावातील त्रुटी निदर्शनास आणल्या. वस्तूंचा पुरवठा झाल्यानंतर एक महिन्यात ६५ टक्के रक्कम, तर संयंत्र कार्यान्वित झाल्यानंतर ३५ टक्के रक्कम कंत्राटदाराला अदा करण्याबाबत निविदेमध्ये समाविष्ट केलेल्या अटीबाबत कोटक यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. तर किती झडपा बदलणार, त्यांचे आयुर्मान किती आदींची माहिती देण्याची मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली. अखेर हा प्रस्ताव राखून ठेवण्याची भाजपने केलेली मागणी रमेश कोरगावकर यांना मान्य करावी लागली. पालिका चिटणीस विभागातील १२ जणांच्या भरतीबाबतच्या प्रतीक्षायादीवरही काँग्रेसचे आसीफ झकेरिया यांनी आक्षेप घेत प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची मागणी केली होती. त्याला भाजपनेही दुजोरा दिला होता. मात्र रमेश कोरगावकर यांनी हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याऐवजी राखून ठेवला. चिटणीस विभागातील एका कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीच्या प्रस्तावालाही काँग्रेसकडून विरोध करण्यात आला होता. मात्र रमेश कोरगावकर यांनी मतदानाअंती हा प्रस्ताव मंजूर केला.

पालिका रुग्णालयांमध्ये गहू आणि तांदळाच्या पिठाचा पुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात आला होता. पूर्वीच्या स्थायी समितीने हा प्रस्ताव राखून ठेवला होता. रुग्णालयाला पुरवठा करण्यात येणाऱ्या पिठासाठी कोणत्या प्रतीचा गहू आणि तांदळाचा वापर करण्यात येणार आहे, असा मुद्दा भाजप, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. प्रशासनाला त्याचे उत्तर देता आले नाही. रुग्णालयाशी संबंधित हा प्रस्ताव असल्यामुळे त्याला मंजुरी द्यावी अशी विनंती शिवसेना नगरसेवकांकडून करण्यात येत होती. मात्र चांगल्या प्रतीच्या गहू आणि तांदळाच्या पिठाचा पुरवठा न केल्यास रुग्णांना अपाय होऊ शकतो असा मुद्दा उपस्थित करीत भाजपने हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यास भाग पाडले.