पालिका चिटणीसांच्या घराबाहेर घोषणाबाजी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या ‘एस’ आणि ‘टी’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप नगरसेविकेचे मत अवैध ठरल्याचा दावा करून विजयाची माळ शिवसेना उमेदवाराच्या गळ्यात घालण्यात आली. भाजपने मागणी करूनही मतपत्रिकेवरील नगरसेविकेची स्वाक्षरी दाखविण्यात आली नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या नगरसेविकांनी शनिवारी पालिका चिटणीसांच्या गोरेगाव येथील घराबाहेर शनिवारी आंदोलन केले.

मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका गेल्या तीन दिवसांमध्ये पार पडल्या. ‘एस’ आणि ‘टी’ प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी झाली. या प्रभाग समितीत शिवसेना आठ, भाजप १०, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीमुळे शिवसेनेच्या उमेदवार दीपमाला बढे यांना १० मते मिळाली. भाजपच्या उमेदवार जागृती पाटील यांनाही १० मते मिळाली. मात्र भाजपच्या एका नगरसेविकेचे मत अवैध ठरल्याचे पीठासीन अधिकारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केले आणि बढे विजयी झाल्या.

हा प्रकार संशयास्पद वाटल्याने भाजप नगरसेवकांनी आपल्या नगरसेविकेचे अवैध झालेल्या मताची पडताळणी करण्यासाठी मतपत्रिका दाखविण्याची मागणी केली. मात्र मतपत्रिका दाखविण्याऐवजी चिटणीस विभागातील कर्मचाऱ्यांनी ती घेऊन सभागृहातून पळ काढला.

आरोप काय?

प्रभारी पालिका चिटणीस संगीता शर्मा यांना हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी हा घाट घातल्याचा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला होता. भाजपच्या नगरसेविकांनी शनिवारी संगीता शर्मा यांच्या गोरेगाव येथील घरावर हल्लाबोल केला. शर्मा यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करून भाजप नगरसेविकांनी घोषणाबाजी करीत हा परिसर दणाणून सोडला.