सध्या राज्यभरात मराठा समाजाकडून मोर्च्यांद्वारे करण्यात येत असलेल्या मागण्यांशी भारतीय जनता पक्ष पूर्णपणे सहमत असल्याचे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांतील मराठा समाजाच्या मोर्चे आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी पक्षातील ज्येष्ठ मंत्री, आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली. या चर्चेनंतर रावसाहेब दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. भाजप मराठा मोर्चेकरांच्या मागण्यांशी पूर्णपणे सहमत आहे. त्यामुळेच सरकार या मागण्यांविषयी गंभीरपणे विचार करत असल्याचे यावेळी दानवे यांनी सांगितले. मराठा समाजाकडून करण्यात येणाऱ्या मागण्यांना सरकारचा कोणताही विरोध नाही. स्वत: मुख्यमंत्री आणि राज्य सरकार या मागण्यांकडे सकारात्मक पद्धतीने बघत आहे. सध्या सरकार यासंदर्भात तज्ज्ञांशी चर्चा करेल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यासाठी पुन्हा एकदा बैठक बोलाविली जाईल, असे दानवे यांनी सांगितले. दानवे यांच्या या विधानामुळे सरकारकडून अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. मात्र, तसे झाल्यास दलित समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते, याचे भान असल्यामुळे याबाबतची पावले टप्प्याटप्प्याने उचलली जाण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारला मोर्चाची धास्ती!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वर्षा निवासस्थानी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी मराठा समाजासंदर्भात चर्चा केली. मराठा समाजाचा आक्रोश दूर करण्यासाठी विविध स्तरांवर संवाद प्रस्थापित करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. मराठा आरक्षणाचा मुद्दा दीर्घकाळ रखडला आहे. त्याचबरोबर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर मराठा समाजाविरोधात होत असल्याने असंतोष वाढत आहे, असे काही मुद्दे चर्चेत उपस्थित करण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर कायदेशीर पेच आहेत. पण त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारीत तथ्य असल्याचा सूर बैठकीत होता. त्यामुळे त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. याशिवाय, मराठा समाजाचे मोर्चे व असंतोष कमी कसा करता येईल आणि त्याचे निवडणुकीवर किती परिणाम होतील, याबाबत भाजपची पक्षपातळीवरही रणनीती आखली जाणार आहे.
मराठा मोर्च्यांविरोधात प्रतिमोर्चे काढू नका