गेल्या दोन महिन्यांमध्ये ठाकरे सरकारमधील एकूण ३ मंत्र्यांची नावं वादात सापडली होती. त्यामध्ये करूणा शर्मा प्रकरणात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले होते. त्यानंतर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड हे अडचणीत आले होते. त्या प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यानंतर आता थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच सचिन वाझे प्रकरणात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले असताना आता राज्यातील अजून एक मंत्री अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात चार्टर्ड विमान वापर प्रकरणात तक्रार दाखल केली आहे.

 

नेमकं काय आहे प्रकरण?

विश्वास पाठक यांनी मुंबईच्या निर्मल नगर पोलीस ठाण्यामध्ये नितीन राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मागील वर्षी करोना लॉकडाऊन काळामध्ये राज्य सरकारच्या चार्टर्ड प्लेनचा खासगी प्रवासासाठी वापर केला आणि त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची रीतसर परवानगी देखील घेतली गेली नव्हती, असा आरोप पाठक यांनी केला आहे. नितीन राऊत यांच्या या प्रवासांचा मोठा आर्थिक फटका बसल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. ६ जुलै २०२० रोजी मुंबई-नागपूर-मुंबई प्रवासासाठी ८ लाख ३५ हजार रुपये, ९ जुलै २०२० रोजी औरंगाबाद-मुंबई-नागपूर-दिल्ली प्रवासासाठी ९ लाख २५ हजार तर १३ नोव्हेंबर २०२० रोजी हैदराबाद-मुंबई-नागपूर-हैदराबाद या प्रवासासाठी ११ लाख ५० हजार रुपये इतका खर्च आला असल्याचं देखील पाठक म्हणाले आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आरोप केलेले असताना आपल्या ट्वीटरवर देखील त्यांनी काही कागदपत्र ट्वीट केली आहेत.

 

“नितीन राऊतांनी विमान कंपन्यांवर दबाव टाकला”

“नितीन राऊत यांनी फक्त खासगी कारणांसाठी अवैधरीत्या प्रवास केला असून विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. नितीन राऊतांनी या विमान कंपन्यांवर दबाव आणून हे केलं आहे”, असा देखील आरोप पाठक यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून केली जात आहे. सचिन वाझे प्रकरणात राज्याच्या गृहमंत्र्यांसोबतच मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर देखील आरोप केले जात असून त्यांना देखील पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे.