राज्य सरकारमधील घटकपक्षाच्या नेत्यांनी शनिवारी भाजप सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. राज्याच्या सत्तेत १० टक्के वाटा द्या, अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, अशी आक्रमक भूमिकाही यावेळी घटकपक्षांनी मांडली. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून मिळत असलेल्या दुर्लक्षित वागणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत, रामदास आठवले आणि राजू शेट्टींनी घटकपक्षांची भूमिका स्पष्ट केली. आम्हाला निवडणुकीपूर्वी देण्यात आलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे सत्तेत दहा टक्के वाटा, चारही घटकपक्षांच्या नेत्यांना मंत्रिपद आणि राज्यातील महामंडळांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या या नेत्यांनी भाजपकडे केल्या आहेत. थोड्याचवेळात हे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत.
यावेळी घटकपक्षांच्या सर्व नेत्यांनी भाजपकडून आपल्याला अन्यायाची वागणूक मिळाल्याचे सांगितले. या बैठकीमागे आमचा सरकारला अडचणीत आणण्याचा कोणताही हेतू नसला तरी, आमच्यामुळेच तुम्ही १२२ जागांपर्यंत मजल मारू शकलात, ही गोष्ट ध्यानात ठेवण्याचा सल्ला आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी दिला. निवडणुकीपूर्वी भाजपने आरपीआयला राज्याच्या सत्तेत १० टक्के वाटा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, भाजपने अजूनपर्यंतही आपला शब्द पूर्ण केलेला नाही. त्यामुळे आम्ही नाराज आहोत. सत्तेत सहभागच मिळणार नसेल तर भाजपसोबत राहण्यात कोणताच अर्थ नसल्याचे आठवलेंनी यावेळी सांगितले. राज्यातील धनगर, मराठा आणि दलित समाजाला सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. याशिवाय, राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकासारखे महत्त्वपूर्ण मुद्देदेखील प्रलंबित असल्याची आठवण आठवलेंनी सरकारला करून दिली.
तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपवर थेट कोरडे ओढले. आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या सांगण्यावरून महायुतीत सामील झालो होतो. मात्र, ते आता आपल्यात नाहीत. त्यांचे नेतृत्व सर्वमान्य होते. त्यामुळे आता घटकपक्षातील प्रत्येक नेत्याला त्यांची उणीव जाणवत आहे. त्यांच्यामध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची धमक होती, असे खडे बोल राजू शेट्टींनी भाजप नेत्यांना सुनावले. तसेच यापुढे ज्या भाजप नेत्याला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, त्यांनीच आमच्याशी चर्चा करावी, असा स्पष्ट इशारा शेट्टी यांनी दिला. निवडणुकीतील यशात आमचा वाटा होता की नाही किंवा आता आम्ही सरकारच्या गळ्यातील धोंड झालो आहोत, याबाबत स्पष्ट ती भूमिका भाजप नेत्यांनी मांडावी. केंद्रात सत्ता येऊन एक वर्ष झाले तरी आमच्या मतदारसंघातील अपेक्षित कामे पूर्ण झालेली नाहीत. मी विरोधी पक्षात असताना जेवढी कामे करून घेतली त्याच्या निम्मी कामेही आता पूर्ण होत नसल्याचा घणाघाती आरोप राजू शेट्टींना भाजप सरकारवर केला.
पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनात घटकपक्षांचा मोठा सहभाग असल्याचे सांगितले. मात्र, आता सत्तेत येऊनही आम्ही जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याची उद्गिग्नता त्यांनी व्यक्त केली. नवीन सरकार जनतेला आणि शेतकऱ्यांना न्याय देईल, या आशेने आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, आम्ही जनतेला दिलेला शब्द पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे सर्व घटकपक्षांतील कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या असून आता आम्ही कोणासमोर गा-हाणे मांडायचे, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.