भाजपा-शिवसेना युती असावी अशीच आमची भूमिका होती. पण शिवसेना स्वबळाची भाषा करत असेल तर २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा तयार आहे. यात नुकसान झालं तर ते शिवसेनेचंच होईल, असे स्पष्ट मत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केले. २०१९ च्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपा यासाठी तयार असल्याचे म्हटले.

ते म्हणाले, २०१९ ची लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक वेगळी लढायला तयार आहे. महाराष्ट्रातील तमाम जनताही या निवडणुकांसाठी तयार असल्याचे आवर्जून सांगत जर यामुळे नुकसान झाले तर ते तुमचंच असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तत्पूर्वी भाजपाचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनीही शिवसेनेचा हा निर्णय आत्मघातकी असल्याचे म्हटले होते. युती न झाल्यास शिवसेनेच्या खासदारांची संख्या ५ वर येईल आणि भाजपा ३० पर्यंत पोहोचेल असे त्यांनी म्हटले होते.

शिवसेना नेत्यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या खासदार व आमदारांबरोबर चर्चा करायला हवी होती. घाईघाईत निर्णय घेतल्यामुळे सेनेचेच नुकसान होईल, असे त्यांनी म्हटले.