वादग्रस्त डॉ. झाकीर नाईक यांचा सवाल; भारतीयांना उद्देशून खुले पत्र

वादग्रस्त इस्लामी धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक यांनी शनिवारी भारतीयांसाठी एक खुले पत्र लिहून पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. माझ्याच देशात मला ‘दहशतवाद्यांचा गुरू’ असे का म्हटले जाते आणि राज्य व केंद्र शासन मला आपला शत्रू का मानते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

जगातील सुमारे दीडशे देशांमध्ये मला सन्मानित करण्यात आले असून माझ्या विचारांचे स्वागत केले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी जे सांगतोय त्याबाबत आत्ताच अवडंबर माजवून आपल्याच देशात मला ‘दहशवाद्यांचा गुरू’ म्हटले जात आहे. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन ही संस्था आपण १९९१ मध्ये स्थापन केली. तेव्हापासून आपण धार्मिक उपदेश करत आहोत, असे डॉ. नाईक यांनी या निवेदनात म्हटले आहे.

ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याने आपल्या बोलण्यापासून प्रेरणा घेऊन हा हल्ला केला असे सांगितले जाते आणि त्याचा आधार घेऊन आपल्या विरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पण आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आपण दोषी नाही व कोणताही गुन्हा केलेला नाही, मात्र तरीही प्रसार माध्यमांसह राज्य आणि केंद्र शासनाच्या दृष्टीने आपण गुन्हेगार ठरलो आहोत. मला गुन्हेगार ठरविण्यासारखे मी काहीही केलेले नाही, असे डॉ. नाईक यांनी या निवेदनात म्हटले आहे.

आपल्या संस्थेवर बंदी घालण्यात आली तर ते भारतीय मुसलमानांसाठी अन्यायकारक ठरेल. आपल्यावर झालेला कोणत्याही स्वरूपातील हल्ला हा भारतीय मुसलमानांवर झालेला हल्ला आहे. विविध यंत्रणांनी केलेल्या तपासात माझ्या विरोधात  एकही पुरावा सापडला नसल्याचा दावाही नाईक यांनी  केला आहे.

राजीव गांधी फाऊण्डेशनला देणगीवरून वाद

नवी दिल्ली :डॉ. झाकीर नाईक यांच्या स्वयंसेवी संस्थेकडून राजीव गांधी फाउण्डेशनला देण्यात आलेली ५० लाख रुपयांची देणगी म्हणजे डॉ. नाईक यांच्या देशविरोधी कारवायांना आश्रय देण्यासाठी घेतलेली लाच होती, असा आरोप भाजपने केला आहे. नाईक यांना संरक्षण देण्यात यूपीए सरकारचे हितसंबंध गुंतले होते. तत्कालीन माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी लोकसभेत २०१२ मध्येच  नाईक यांच्या पीस टीव्हीचा २४ बेकायदेशीर परदेशी वाहिन्यांमध्ये समावेश आहे आणि त्या वाहिनीवरील कार्यक्रम भारताच्या सुरक्षेसाठी पोषक नाहीत असे सांगितले होते त्याचा संदर्भ देत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी करत काँग्रेसवर टीका केली

  • काँग्रेसच्या सरकारनेच नाईक यांच्या वाहिनीचा उल्लेख करत सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता मग २०११ मध्ये फाऊण्डेशनला मिळालेली देणगी परत का केली नाही, असा सवालही केला. काही महिन्यांपूर्वीच  देणगी परत करण्यात आली असल्याच्या काँग्रेसच्या दाव्याबद्दलही प्रसाद यांनी संशय व्यक्त केला आहे.