01 October 2020

News Flash

पुरावरून राजकारण ; भाजप आणि राष्ट्रवादीची परस्परांवर कुरघोडी

पुराची तीव्रता लक्षात येताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी यात्रेला अल्पविराम देत मुंबई गाठली.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्य़ाला बसलेल्या पुराच्या तडाख्यामुळे जनजीवनाची दाणादाण उडाली असतानाच राजकीय पक्षांनी पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विधानसभा निवडणूक लक्षात घेता भाजप आणि राष्ट्रवादीने परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी सोडलेली नाही.

कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्य़ांना पुराचा तडाखा बसला. पूरग्रस्तांना मदत देण्यास यंत्रणांनी प्राधान्य दिले आहे; परंतु पुराचे पाणी ओसरण्यापूर्वीच परस्परांवर कुरघोडी सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र महाजनादेश यात्रेत मतांचा जोगवा मागत असल्याची टीका काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. पुराची तीव्रता लक्षात येताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी यात्रेला अल्पविराम देत मुंबई गाठली. त्यानंतर पूरग्रस्त भागाचा दौरा केला.

पूरपरिस्थिती लागोपाठ चौथ्या दिवशीही कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच होते. याची प्रचीती गिरीश महाजन आणि सुभाष देशमुख या मंत्र्यांना आली. त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे आव्हान सत्ताधारी भाजपसमोर असेल. सरकारी यंत्रणा योग्यरीत्या राबवून पाणी ओसरल्यावर पुढील १० ते १५ दिवसांमध्ये सर्व पूरग्रस्तांना मदत मिळेल याची खबरदारी सरकारला घ्यावी लागेल. अन्यथा तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला फटका बसू शकतो. यातच पूरग्रस्त भागात शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी दिली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्य़ांवर भाजप आणि शिवसेनेची मदार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्य़ातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेने जिंकल्या. सांगलीची जागा भाजपने कायम राखली. कोल्हापूर जिल्ह्य़ात विधानसभेच्या १०, तर सांगली जिल्ह्य़ात आठ जागा आहेत. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत या दोन जिल्ह्य़ांमधील १८ जागांपैकी शिवसेनेने सात, भाजपने सहा, राष्ट्रवादी चार तर काँग्रेसने एक जागा जिंकली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन जिल्ह्य़ांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिक लक्ष केंद्रित केले होते. या दोन जिल्ह्य़ांमध्ये १५ तरी जागा जिंकण्याचे युतीचे लक्ष्य आहे. पुरामुळे परिस्थिती बदलली आहे. पाणी ओसरल्यावर पूरग्रस्तांना मदत मिळणे महत्त्वाचे ठरेल. यासाठी चंद्रकांत पाटील यांना विशेष लक्ष घालावे लागणार आहे. पूरग्रस्तांना मदत मिळण्यात विलंब झाला किंवा साऱ्यांना पुरेशी मदत न मिळाल्यास त्याचे राजकीय परिणाम होऊ शकतात.

सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला याचा फटका बसू शकतो. यामुळेच सरकारकडून पूरग्रस्तांना मदत कशी मिळते यावरच सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे भवितव्य अवलंबून असेल. २००९च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी सांगली जिल्ह्य़ात जातीय दंगल झाली होती. त्याचा फटका काँग्रेसला बसून भाजपच्या जागा वाढल्या होत्या याकडे लक्ष वेधण्यात येते.

सरकारने पूरपरिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. सांगली जिल्ह्य़ात सात दिवस झाले तरीही नागरिकांना मदत मिळालेली नाही. यावरून सरकारचा नाकर्तेपणा सिद्ध होतो, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. पूरपरिस्थिती हाताळण्यावरून काँग्रेसनेही सरकारवर टीका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 4:59 am

Web Title: bjp and ncp clash over flood issue in maharashtra zws 70
Next Stories
1 रेल्वेच्या तीनही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
2 मुंबई-पुणे मार्गावर आणखी ८ ‘शिवनेरी’
3 बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग ; वांद्रे-कुर्ला स्थानकाच्या कामास मार्च २०२० पर्यंत आरंभ
Just Now!
X