News Flash

लालबागचा राजा मंडळाची ८७ वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये, आशिष शेलारांचं आवाहन

गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी? आशिष शेलारांची लालबागचा राजा मंडळाला विचारणा

लालबागचा राजा मंडळाची ८७ वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये, आशिष शेलारांचं आवाहन

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून मूर्तीची प्रतिष्ठापना करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. लालबागचा राजा मंडळाने पत्रकार परिषद घेत गणेशोत्सवाचे ११ दिवस ‘आरोग्योत्सव’ साजरा केला जाईल अशी माहिती दिली. लालबागचा राजा फक्त मुंबई आणि देशात नाही तर जगभरातील गणेशभक्तांसाठी श्रद्धास्थान आहे. मंडळाने घेतलेल्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान भाजपा नेते आशिष शेलार यांनी मात्र लालबागचा राजा मंडळाने ८७ वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये असं आवाहन केलं आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबविण्याचा घेतलेला निर्णय “स्तुत्यच”. पण मंडळाची ८७ वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये. गणेशभक्तांची श्रद्धा पाहता शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो, याचा आदर्श निर्माण करण्याची “हीच ती वेळ”!”.

“संकट मोठं आहे, अशावेळी सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरते. संकट काळात राजाचे ऑनलाइन दर्शन सुध्दा गणेशभक्तांना दिलासा देऊ शकते! या देशात श्रध्देला मोल नाही..श्रद्धा तोलून ही पाहता येत नाही…म्हणून गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी?,” अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी अजून एक ट्विट केलं असून, “सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षात पारंपरिक गणेशोत्सव अडचणीत आलाय..पण बाप्पा मार्ग काढेल! मुंबईत छोट्या मंडळांसह गणेश गल्ली, चिंतामणी यांनी मुर्तीची उंची कमी करुन, सामाजिक उपक्रमांसह उत्सवाची परंपरा टिकवणार.. त्यांचे कौतुकच!,” असं म्हटलं आहे.

दुसरीकडे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनेदेखील लालबागचा राजा गणेश मंडळाला पत्र लिहिलं असून परंपरा अखंडित ठेवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, “लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या निर्णयाचं स्वागत आहे. मंडळाने जाहीर केलेला आरोग्य उत्सव उपक्रम कौतुकास्पद आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या चार फूट उंचीच्या मूर्तीबाबतच्या आवाहनानंतर केवळ लाईव्ह दर्शनाची सोय उपलब्ध करुन मंडळाने भाद्रपद उत्सवाची परंपरा अखंडित ठेवावी अशी समन्वय समितीची इच्छा आहे”.

समन्वय समितीने यावेळी मंडळाच्या निर्णयाला विरोध नाही मात्र परंपरा अखंडित ठेवता येईल यासाठी सुवर्णमध्य काढावा अशी विनंती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 11:46 am

Web Title: bjp ashish shelar appeal to lalbaugcha raja ganeshotsav mandal sgy 87
Next Stories
1 आता भाजपातल्या चिनी टिकटॉक स्टार्सचं काय होणार? शिवसेनेची खोचक टीका
2 मुंबईत मुसळधार: हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट
3 २३५ करोनायोद्धय़ांचा मृत्यू
Just Now!
X