News Flash

शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का?; आशिष शेलार संतापले

"शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का?"

शरजील इस्मानीच्या हिंदूविरोधी वक्तव्यावरुन भाजपा आक्रमक झाली असून शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का? अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली आहे. ठाकरे सरकारने शरजीलला पळून जाण्यात मदत केली असा गंभीर आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

“शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणं याचा अर्थ यांचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. अटक केली जाईल म्हणजे कधी आम्ही मागणी केल्यावर. परिषदेला परवानगीच का दिली?,” असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे. “शरजील इस्मानीने परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर त्याला मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर का जाऊ दिलं? त्याला पळून जाण्यासाठी मदत करण्याचं काम सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीने केलं आहे. हे त्यांचं पाप आहे,” असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

आणखी वाचा- “शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून…”, संतापलेल्या फडणवीसांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

“शरजीलला पळून जाण्यात मदत केल्यानंतर, भाजपाने दोन दिवस आंदोलन केल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करु हे म्हणणं म्हणजे पश्चातबुद्धी आहे. शिवसेनेने हिंदूंना सडलेला म्हणणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचं काम का केलं हे स्पष्ट करावं,” अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

“शिवसेनेने आमच्याकडे क्लास लावावा. नागपूरच्या कार्यालयात आपण वारंवार भेटला आहात, आताही जावं,” असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताच्या कार्यक्रमात बोलताना हिंदुत्व भाजपाची मक्तेदारी नाही असं म्हटलं होतं. यावर बोलताना ते म्हणाले की, “जे भाजपाला बाजूला ठेवण्याच्या हेतूने स्वत:च पर्याय म्हणून दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन, आपल्या विचारधारेला तिलांजली देऊन आले आहेत. त्यांनी देशातील जनतेच्या मानसिकतेच्या मतांवर भाष्य करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सुर्यावर थुंकण्याचे प्रयोग करु नयेत”.

आणखी वाचा- शरजील उस्मानी एल्गार परिषदेत काय म्हणाला? वाचा संपूर्ण भाषण…

“शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे. महाराष्ट्रावर परराज्यातून कोणी टीका केली तर यांना महाराष्ट्रद्रोह आठवतो. पण परदेशातून कोणी आपल्या देशाच्या विषयावर टिप्पणी, बदनामी केली तर यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. हे परदेशातील कनेक्शन काय आहे हे संजय राऊत यांनी जनतेसमोर मांडावं. आंदोलन कोणी आणि कसं केलं जावं याचे काही नियम आहेत,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं.

आणखी वाचा- एल्गार परिषद : शरजील चांगलं बोलला पण….; कोळसे पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

“जो कोणी देशहिताची, देशरक्षणाची भूमिका घेईल त्या व्यक्ती आणि विचाराच्या विरोधात काही मंडळी ही सातत्याने परकीय शक्तींच्या मदतीने उभं राहून आंदोलन करतात. त्यात आता शिवसेनादेखील मिळाली आहे हे दुर्दैवी आहे,” असा गंभीर आरोप आणि टीका आशिष शेलार यांनी केली.

आणखी वाचा- शरजील उस्मानीवर चाप बसवण्यासाठी मुख्यमंत्री योगींना पाठवले पत्र – चंद्रकांत पाटील

संजय राऊत यांनी गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांची भेट घेण्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “कोणी कोणाला कधी आणि कसं भेटावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण शिवसेना शेतकरी आंदोलकांना भेटायला गेली असेल तर लोकसभेत, राज्यसभेत, महाविकास आघाडीच्या बैठकीत काय भूमिका होती आणि आझाद मैदानावरील शेतकरी आंदोलनावेळी काय भूमिका होती हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. अमिबाला सुद्ध लाज वाटावी अशाप्रकारे एकाच वेळी चार पद्धतीने चालणारा पक्ष शिवसेना आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 11:10 am

Web Title: bjp ashish shelar on maharashtra government elgar parishad sharjil usmani sgy 87
Next Stories
1 उपनगरी रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षणाला बळ
2 ‘बेस्ट’ला ७५० कोटींचे अनुदान
3 वायुप्रदूषण करणारी वाहने रडारवर
Just Now!
X