शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्राने मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज दिलं पाहिजे अशी मागणी केली आहे. दरम्यान यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली असून देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? अशी विचारणा केली आहे. हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल. तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या? हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला!”.

यानंतर अजून एक ट्विट करत आशिष शेलार यांनी काही प्रश्न विचारले आहेत. “मुंबईला कोरोना मुक्त कधी करणार ? मुंबईला पूर्वपदावर कधी आणणार? मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? हे सांगा,” असे सवाल आशिष शेलार यांनी विचारले आहेत. मुंबई पुरामुळे तुंबणार नाही, याची हमी द्या असंही ते म्हणाले आहेत. केंद्र सरकार शक्य ते करुन दाखवत आहेतच…आता तुम्ही काहीतरी करुन दाखवा ना असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

आणखी वाचा- अतुल भातखळकरांचा शिवसेनेविरोधात खोचक निशाणा

आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये संजय राऊत यांचा उल्लेख करणं टाळलं आहे. संजय राऊत यांनी देशाच्या आर्थिक राजधानीचं महत्त्व टिकवणं महत्त्वाचं आहे. मुंबईचं आर्थिक महत्त्व देशात आणि जगात टिकणं महत्त्वाचं आहे त्यामुळे पंतप्रधानांनी वेगळं आर्थिक पॅकेज दिलं पाहिजे अशी मागणी केली आहे. मुंबईतून २० ते २५ क्के महसूल देशाच्या तिजोरीत जमा केला जातो. त्यामुळे फक्त मुंबईच नाही तर मुंबईसारख्या शहरांसाठी आर्थिक पॅकेज देणं गरजेचं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.