भाजपची सडकून टीका

उमाकांत देशपांडे, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूत्वासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला, त्यापायी मतदानाचा अधिकारही गमावला, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या राजकारणासाठी बाळासाहेबांच्या हिंदूत्वाला काळिमा फासला असून हिंदूत्व खोटे ठरविले, असे खरमरीत टीकास्त्र भाजपचे मुख्य प्रतोद अ‍ॅड. आशीष शेलार यांनी शिवसेनेवर सोडले. घूमजाव किंवा यू टर्न म्हणजेच ‘उद्धव टर्न’ अशी आता व्याख्या झाली असून ‘देव, देश व धर्म’ यासाठी भाजपबरोबर लोकसभेलाही युती करणाऱ्या शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करून मतदारांचा विश्वासघात केला, असा टोला शेलार यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचे स्वागत केले आहे. भाजपच्या संगतीमुळे शिवसेनेने अनेक वर्षे धर्माच्या आधारावर राजकारण केले, मात्र शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी झाली असल्याने आता ती मूळ भूमिकेवर आली असल्याची टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ करून शिवसेनेने चूक केल्याची कबुली गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात बोलताना दिली होती. त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत.

शिवसेना नेते डॉ. रमेश प्रभू यांनी विलेपार्ले मतदारसंघातून १३ डिसेंबर १९८७ रोजी झालेली विधानसभा निवडणूक लढविली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणुकांच्या प्रचारसभेत हिंदूुत्वाच्या मुद्दय़ावर मते मागितल्याने ही निवडणूक गैरमार्गाचा अवलंब असल्याचा आरोप करीत प्रभाकर कुंटे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. धर्माच्या आधारावर मते मागितल्याने प्रभू यांची निवडणूक अवैध ठरविण्यात आली होती. हिंदुत्वाच्या आधारे निवडणुकीत मते मांडण्याचा मुद्दा, शिवसेना नेत्यांना निवडणूक लढविण्यास घातली गेलेली बंदी आदी मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग यांच्यापुढे कायदेशीर मुद्दय़ांचा कीस काढला गेला. तेव्हापासून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत शिवसेना हिंदुत्वाचा गजर करीत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राममंदिरांचा मुद्दय़ावर आक्रमक होऊन अयोध्येला जाऊन आरतीही केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीसह सत्ता स्थापन केल्याने धर्मनिरपेक्षतेची निव्वळ कासच धरलेली नाही, तर धर्म व राजकारण यांची मिसळ केल्याने फटका बसल्याची कबुलीच उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

अयोध्या दौऱ्याचा विसर – शेलार

यासंदर्भात भाजप नेते अ‍ॅड. शेलार म्हणाले, बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी प्रदीर्घ लढा दिला. मतदानाचा अधिकार गमावण्याची वेळ आली, तेव्हा माझे एक मत गेले तरी चालेल, पण माझे करोडो हिंदूू बांधव भरभरून मते देतील, अशी भूमिका घेतली. हिंदुत्वाच्या आधारे शिवसेनाप्रमुखांनी राजकारण करून यश मिळविले, त्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी घूमजाव करून खोटे ठरविले आहे. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देव (राममंदिर), देश (सर्जिकल स्ट्राईक) व धर्म (हिंदुत्व) यासाठी शिवसेनेने भाजपशी युती केली. मात्र आता अयोध्येला जाण्याचे उद्धव ठाकरे विसरले, अन्य देशांमधून आलेल्या हिंदूूंचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, धर्म व राजकारण यांची सरमिसळ नको, अशी भूमिका घेतली. हा ३६० अंशांचा ‘उद्धव ठाकरे’ (यू टर्न) आहे, असे टीकास्त्र शेलार यांनी सोडले.