अयोध्येतील राम जन्मभूमीलगतच्या जमिनीच्या वादावरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. शिवसेनेनं या मुद्द्यावरून भाजपावर टीका केली असताना आता त्यावरून भाजपानं देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून आज शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावरून आता दोन्ही बाजूच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. “राम मंदिर उभारणीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, आम आदमी पार्टी, डावे हे पक्ष बदनाम करत आहेत. हे सगळे बाबराचे आणि बाबरीचे समर्थक पक्ष आहेत”, असं ट्वीट भातखळकरांनी केलं आहे.

 

त्यात आता टिपूवादी सेनेची भर!

यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये अतुल भातखळकरांनी शिवसेनेला थेट टिपूवादी म्हटल्यामुळे यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “राम मंदिर उभारणीला बदनाम करणारे पक्ष बाबराचे आणि बाबरीचे समर्थक पक्ष आहेत. त्यांना राम मंदिर नकोच होते. आता हे एकवटलेत मंदिर उभारणीत विघ्न आणायला. त्यात भर पडली आहे ज्वलंत टिपूवादी शिवसेनेची. यांना लक्षात ठेवा”, असं भातखळकर या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

 

अस्तनीतल्या निखाऱ्यांपासून सावध राहा!

दरम्यान, यासोबतच अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. “वसूली सेनेने इटालियन काँग्रेसकडून राम मंदिर आंदोलन बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे. बाबरप्रेमी पप्पू आणि पप्पूच्या मम्मीला खूष करण्यासाठी मंदिर उभारणीला बदनाम करण्याचे आणखीन प्रयत्न होतील. अस्तनीतल्या निखाऱ्यांपासून जनतेने सावध राहावे”, असं ट्वीट भातखळकरांनी केलं आहे. भातखळकर यांच्याप्रमाणेच इतर भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

नेमकं झालं काय?

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेनं आक्रमक शब्दांत टीका केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनाच्या बाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. याची माहिती मिळताच मोठ्या संख्येनं शिवसेना कार्यकर्ते जमा झाले. यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आधी वाद आणि त्याचं पर्यवसान बाचाबाचीमध्ये झालं.

“भाजपा कार्यकर्ते शिवसेना भवनवर हल्ला करणार होते”

दरम्यान, भाजपा कार्यकर्ते विटा, दगडं घेऊन शिवसेना भवनावर हल्ला करण्यासाठी आले होते, असा खळबळजनक दावा शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे. “भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते शिवेसना भवनात जमले होते. पण जेव्हा भाजपाचे काही कार्यकर्ते विटा, दगडं घेऊन शिवसेना भवनवर हल्ला करण्यासाठी येत आहेत अशी माहिती मिळाली तेव्हा शिवसैनिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी त्यांना थाबवलं असता बाचाबाची झाली”, असं ते म्हणाले.