अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर काही दलित गटांनी भारत बंद पुकारला होता, या समाजाच्या मनांत भाजपबद्दल वाढणारी खदखद लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या खासदारांना दलितांचे प्राबल्य असलेल्या गावांत  येत्या १४ एप्रिल ते ५ मे या कालावधीत  दलितांचे प्राबल्य असलेल्या गावांत किमान दोन रात्री वास्तव्य करावे आणि समाजाच्या मनात भाजपबद्दल विश्वास निर्माण होईल असे पाहावे, अशा सूचना मोदी यांनी दिल्याचे एका खासदाराने सांगितले. देशात अशा प्रकारची किमान २० हजार गावे असल्याचे मोदी यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येवर मोदी हे डॉ. आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला ते ठिकाण देशाला समर्पित करण्याची शक्यता आहे.

२० हजार गावांत मोदी सरकारची कामे पोहोचवणार

दलित आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटीसारख्या विषयांवरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर हल्ले करण्यास सुरुवात केल्याने त्याला उत्तर देण्यासाठी ११ एप्रिल रोजी महात्मा जोतिबा फुले यांची,  तर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभर साजरी करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्याचबरोबर १४ एप्रिलपासून ५ मे पर्यंतच्या काळात मोदी सरकारने गरिबांसाठी केलेले काम २० हजार गावांपर्यंत पोहोचवण्यात येणार असून केंद्रीय मंत्रीही त्यात सहभागी होऊन गावात एक दिवस मुक्काम करणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिल्लीतील आंबडेकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येईल. त्याचबरोबर १४ एप्रिलपासून ते ५ मे या कालावधीत शेतमालाला दीडपड भाव, गॅस सिलेंडर देणारी योजना, वीज देणारी योजना, शौचालय देणारी योजना, जनधन, प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचा आरोग्य विमा यासारख्या योजनांची माहिती देशभरातील २० हजार गावांत पोहोचवणार आहोत. आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटीसारख्या विषयांवरून विरोधक समाजात तेढ निर्माण करण्याचे राजकारण करत असून ते दुर्दैवी आहे. देशाला तोडणारी भाषा विरोधक करत आहेत, अशी टीकाही अमित शहा यांनी केली.

मोदी सरकार मात्र देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत असल्याचे नमूद करत २०१९ मध्ये आतापेक्षाही जास्त जागा जिंकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कॉंग्रेसमुक्त भारताच्या भाजपच्या भूमिकेला विरोध केलेला नसून ते केवळ राजकारणात ठीक आहे, असे म्हटल्याचेही शहा यांनी स्पष्ट केले.

१२ एप्रिलला आंदोलन

  • योजनांची माहिती देशभरातील २० हजार गावांत पोहोचवणार आहोत. मंत्री ते पदाधिकारी यात सहभागी होतील.
  • संसदेत सुरू असलेल्या विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज होत नाही
  • त्याचा निषेध करण्यासाठी १२ एप्रिलला एक दिवस पक्षाचा प्रत्येक खासदार आपापल्या मतदारसंघात धरणे आंदोलन करणार आहे.