‘रालोआ’ची मात्रा देऊन सेनेचा विरोधही मवाळ करणार
भाजपच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष नरेंद्र मोदी यांचे निस्सीम चाहते असलेल्या राज ठाकरे यांच्या ‘मनसे’ला भाजपप्रणित ‘रालोआ’मध्ये सामावून घेण्यासाठी  भाजपमध्ये वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. मोदी हे देशाचे पंतप्रधानपदी आरुढ झालेले पाहण्यास उत्सुक असलेल्या राज ठाकरे यांनी आता त्यासाठीच ‘रालोआ’मध्ये सामील व्हावे आणि राष्ट्रीय राजकारणाचा विचार करून शिवसेनेनेही त्यास विरोध करू नये, यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील आहेत. राज ठाकरे रालोआमध्ये सहभागी झाल्यास राज्यातील महायुती आपोआपच बळकट होईल, असे भाजपचे आडाखे आहेत.  
मोदी यांच्या निवडीनंतर रालोआमध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसू लागताच नवे मित्र जोडण्याच्या हालचालींना भाजपमध्ये वेग आला. महाराष्ट्रात शिवसेना हा भाजपचा पारंपरिक मित्र असून रिपाईंचे रामदास आठवलेदेखील रालोआमध्ये सहभागी आहेत. नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची वाटचाल सोपी व्हावी यासाठी लोकसभेची प्रत्येक जागा महत्वाची असल्याने महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांवर रालोआने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे, राज्यातील काँग्रेस आघाडीच्या विरोधातील मतविभागणी टाळण्यासाठी मनसेला सोबत घेण्याकरिता स्वत मोदी पुढाकार घेतील आणि प्रसंगी शिवसेनेचेही मन वळवतील, असे भाजपच्या सूत्रांचे मत आहे.
राज ठाकरे हे नरेंद्र मोदी यांचे निस्सीम चाहते असून गुजरातमध्ये मोदी सरकारने घडविलेल्या विकासावर ते अक्षरश फिदा आहेत. मोदी यांच्या निमंत्रणावरूनच दोन वर्षांंपूर्वी ऑगस्टमध्ये राज ठाकरे यांनी दहा दिवसांचा गुजरात दौराही केला होता. या दौऱ्यानंतर राज ठाकरे यांनी मोदी यांच्या विकासाच्या मॉडेलची भरभरून स्तुती केली होती. त्यानंतर महिनाभरातच, सप्टेंबर २०११ मध्ये मोदी यांच्या सद्भावना उपवासाच्या वेळीही राज ठाकरे यांनी मोदी यांची भेट घेतली होती. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी आपली इच्छा आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले होते. गेल्या डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत मोदी यांनी पक्षाच्या विजयाची हॅटट्रिक साधल्यानंतर मोदी यांच्या शपथविधी समारंभास राज ठाकरे यांना सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात आले होते.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तर राज ठाकरे यांच्या मनसेच्या काही उमेदवारांनी त्यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर मोदी यांची प्रतिमा झळकविली होती. मोदी यांचे विकासाचे मॉडेल महाराष्ट्रातही अमलात आणावे यासाठी राज ठाकरे आग्रही आहेत. या पाश्र्वभूमीवर आता मोदी यांना पंतप्रधानपदावर बसविण्यासाठी कंबर कसलेल्या भाजपच्या राज ठाकरे यांच्याबद्दलच्या अपेक्षा उंचावल्या असून, मोदी यांच्यासाठी राज ठाकरे यांचा पक्ष महायुतीत सहभागी होईल असा दावा पक्षाचे नेते करीत आहेत. शिवसेनेनेही मोदी यांच्या निवडीचे स्वागतच केले आहे. त्यामुळे मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकांसाठी कराव्या लागणाऱ्या बेरजेच्या राजकारणात शिवसेनेचे अडथळे येणार नाहीत, असा विश्वास या सूत्रांनी व्यक्त केला.