प्रत्येक कार्यकर्त्यांकडून पक्षनिधीसाठी योगदान

विशेष प्रतिनिधी, मुंबई</strong>

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘समर्पण दिवस’चे औचित्य साधत भाजपने महिनाभरासाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचार मोहीम आखली असून त्याची सांगता ३ मार्चला मोटारसायकल रॅलीने होणार आहे. याचबरोबर राज्यबरोबरच देशभरातील भाजप कार्यकर्त्यांकडून पक्षनिधीसाठी प्रत्येकी ५० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत देणगी घेऊन पक्षनिधी उभारला जाणार आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी ‘समर्पण दिवस’ कार्यक्रम भाजपच्या प्रदेश कार्यालयात झाला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. भाजपतर्फे राज्यात  समर्पण दिवसानिमित्त कार्यक्रम झाले.  भाजपने आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रचाराचा एक टप्पा पूर्ण करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार प्रत्येक बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांकडून पक्षनिधी उभारला जाणार आहे. त्यासाठी ५० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत इच्छेनुसार देणगी पक्षनिधीसाठी गोळा करण्यात येत आहे. त्याचबरोबर १२ फेब्रुवारी ते २ मार्च या काळात ‘मेरा परिवार भाजप परिवार’ या घोषवाक्यासह प्रचार करण्यात येणार आहे.

युतीची चर्चा सुरू

शिवसेनेसह युती करण्याबाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. कोण व कधी चर्चा करत आहे हे सांगता येणार नाही. पण काँग्रेस व राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर भाजप-शिवसेना युती नक्की होईल, असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. भाजपच्या राजकीय धोरणांमुळे युती लटकल्याची शिवसेनेची टीका फेटाळून लावत, मुनगंटीवार यांनी युती होण्यात काही अडचण येणार नाही, असे सांगितले.