शिवसेना भाजपला मदत करणार का?

राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपने चार उमेदवार रिंगणात उतरविल्याने चुरस निर्माण झाली आहे. भाजपच्या चौथ्या उमेदवारामुळे साहजिकच काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली. शिवसेनेने अतिरिक्त मते भाजपला दिली तरच भाजपचा चौथा उमेदवार लढत देऊ शकत असल्याने शिवसेनेच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले. राज्यसभेच्या सहा जागांकरिता सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि केरळमधील पक्षाचे नेते व्ही. मुरलीधरन यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा चौथा अर्ज भाजपकडून सादर करण्यात आल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली. भाजपच्या चौघांसह कुमार केतकर (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना) आणि वंदना चव्हाण (राष्ट्रवादी) यांचे अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवापर्यंत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विलास आठवले यांनी दिली.

विजया रहाटकर यांनी डमी म्हणून अर्ज दाखल केल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत असले तरी काँग्रेसचे नेते सावध झाले. भाजपने चौथा उमेदवार रिंगणात ठेवल्यास कोणाचे नुकसान होऊ शकते याचीच चर्चा सुरू झाली. मतदान खुल्या पद्धतीने असल्याने राजकीय पक्षांच्या आमदारांना पक्षादेश पाळणे आवश्यक आहे. अन्यथा आमदारकी रद्द होण्याची तसेच सहा वर्षे अपात्रतेची टांगती तलवार येऊ शकते. राज्यसभा निवडणुकीत विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या ४१०१ मतांची आवश्यकता आहे.

राणे यांनी अर्ज भरला तेव्हा नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर हे काँग्रेसचे दोन आमदार त्यांच्या समावेत होते. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने एक जागा रिक्त झाली आणि सुरूपसिंह नाईक हे आजारी आहेत. याशिवाय राणेसमर्थक दोन आमदार काँग्रेसला मते देण्याबाबत शंका व्यक्त केली जाते. परिणामी काँग्रेसची चार मते कमी झाली आहेत. काँग्रेसचे संख्याबळ आता ४१ झाले असून, तीन मतांबाबत पक्षाला हमी नाही. राष्ट्रवादीचे दोन आमदार तुरुंगात असून, यापैकी रमेश कदम यांनी राष्ट्रपतिपदाची निवडणूक आणि विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपला मतदान केले होते. परिणामी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पहिल्या पसंतीच्या मतांसाठी बेगमी करावी लागेल. काँग्रेसने शेकाप, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट आणि समाजवादी पार्टीच्या चार मतांचा पाठिंबा गृहीत धरला आहे. काँग्रेसची काही मते फुटतील, असा दावा भाजपच्या गोटातून करण्यात येत होता.

शिवसेना अतिरिक्त मते भाजपला देणार का?

शिवसेनेकडे २१ अतिरिक्त मते असून, यावर भाजपच्या चौथ्या उमेदवाराचे भवितव्य ठरू शकते. भाजप आणि शिवसेनेतील वाढती कटुता तसेच शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा दिलेला नारा यामुळे शिवसेना आपल्याकडील अतिरिक्त मते भाजपकडे वळविण्याबाबत शंका आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची समजूत काढल्यास चित्र बदलू शकते. भाजपच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अलीकडच्या काळात जवळ आले आहेत. यामुळेच काँग्रेसचे नेते भाजपला रोखण्याकरिता शिवसेनेकडे मदतीचा हात पुढे करू शकतात. शिवसेनेकडे अतिरिक्त मते आहेत. शिवसेनेने दुसऱ्या पसंतीची काही मते काँग्रेसला दिल्यास केतकर यांचा विजय शक्य होऊ शकतो. शिवसेना अतिरिक्त मते देणार नाही हे स्पष्ट झाल्यास भाजपच्या रहाटकर यांचा अर्ज मागे घेतला जाईल.

राणे अखेर भाजपचे उमेदवार

काँग्रेसला रामराम ठोकल्यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार होते. पण शिवसेनेचा विरोध लक्षात घेता भाजपने त्यांना स्वतंत्र पक्ष काढण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राणे यांनी वेगळ्या पक्षाची स्थापना केली होती. राज्यसभेसाठी राणे यांनी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.