गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबई भाजपने आज दणक्यात मोदी सरकारच्या वर्षपूर्तीचा सोहळा साजरा केला. नरिमन पॉइंट येथील प्रदेश भाजपच्या कार्यालयासमोरील ‘योगक्षेम रस्ता’ ऐन गर्दीच्या वेळी अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि फटाक्यांच्या धुराने काही काळ गुदमरून गेला. काँग्रेसने मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘अच्छे दिन’चा स्मृतिदिन पाळला, तर, भाजपचा मित्रपक्ष असलेली शिवसेना मात्र भाजपच्या जल्लोषापासून अलिप्तच राहिली.
भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर दुपारनंतर गर्दी सुरू झाली होती. मुंबईतील व राज्यातील लहान-मोठे नेते दुपारीच भाजप कार्यालयात दाखल झाले होते. चार-साडेचारच्या सुमारास पाण्याच्या बाटल्यांचे खोके भरलेला एक टेम्पो दाखल झाला. काही कार्यकर्त्यांनी मिठाईचे भलेमोठे खोकेही सोबतच आणले होते. कुणी तरी २१ किलो लाडूदेखील आणले होते. भाजपच्या कार्यालयात एकमेकांना मिठाई खिलवत मोदी सरकारच्या वर्षपूर्तीचा आनंद साजरा केला जात होता. पाच वाजण्याच्या सुमारास चंद्रकांतदादा पाटील, बबनराव लोणीकर हे मंत्री, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयवंतीबेन मेहता, आमदार राज पुरोहित व अन्य नेत्यांची भाषणे सुरू झाली आणि मोदी सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा लेखाजोखा मांडत सर्व वक्त्यांनी मोदी सरकारवर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला. आशीष शेलार यांचे भाषण संपले आणि भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोरील वाहनांच्या गर्दीने भरलेल्या रस्त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण सुरू झाली. ढोल-ताशे दुमदुमू लागले आणि फटाक्याच्या माळांची आतषबाजी सुरू झाली.. साऱ्या रस्त्यावर मोदी सरकारच्या वर्षपूर्तीचा उत्साह जणू ओसंडून वाहू लागला.
याच दिवसाचे औचित्य साधून काँग्रेसने मात्र, ‘अच्छे दिन’चा स्मृतिदिन पाळण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत निषेध मोर्चा काढून काँग्रेसने मोदी सरकारच्या कारकीर्दीचा निषेध केला. मात्र, जनतेने काँग्रेसचा पराभव करून गेल्या वर्षीच त्यांचा स्मृतिदिन साजरा केला असून आता हा पक्ष केवळ जिवंत राहण्याची केविलवाणी धडपड करीत आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लगावला. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीचा सोहळा भाजपमध्ये साजरा होत असताना, त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेत मात्र, या मुद्दय़ावर सामसूमच होती. भाजपच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवून सेनेच्या नेत्यांनी मोदी सरकारबद्दलची नाराजी पुन्हा एकदा स्पष्टपणे नोंदविली.