दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. त्यावर आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखामधून विरोधकांवर तोंडसुख घेण्यात आलं. साकीनाका बलात्कार प्रकरणावरून टीका करणाऱ्या विरोधकांना शिवसेनेने कथुआ आणि हथरसच्या अशाच घटनांची आठवण विरोधकांना करून दिली आहे. त्यावरून भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्र वाघ यांनी शिवसेनेवर आणि विशेषत: संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “हा तर जोक ऑफ द डे झाला”, अशा खोचक शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.

“बलात्काऱ्यांना बळ देण्याचं काम सुरू आहे”

“राज्यातल्या महिलांना वाचवण्यासाठी शक्ती कायदा आणण्याच्या गोष्टी तुम्ही करता. पण तो तर बाजूलाच राहिला. पण या बलात्काऱ्यांना बळ देण्याचं काम तुमचं चाललंय. एफआयआर होत नाहीत त्यासाठी आम्हाला कोर्टात जावं लागतंय. ज्याच्यावर एफआयआर आहेत ते बाहेर उजळ माथ्याने फिरतायत. आज बलात्कारीच म्हणतायत आम्ही बलात्काऱ्यांना सोडणार नाहीत. हा तर जोक ऑफ द डे झाला. तुम्ही घेत असलेली ही दुटप्पी भूमिका चालणार नाही. राज्यातल्या प्रत्येक गोष्टीची दखल भाजपा घेणार. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे प्रश्न विचारणार आणि सत्ताधारी म्हणून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील”, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी निशाणा साधला.

“हथरस, कथुआबद्दल संवेदना आहेत”

दरम्यान, देशातील बलात्काराच्या इतर घटनांबद्दल आम्हाला संवेदना असल्याचं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या. “हथरस, कथुआ देशातल्या सगळ्या घटनांबद्दल आम्हाला संवेदना आहेत. पण आम्ही महाराष्ट्रात राहातो. ही आमची कर्मभूमी आहे. त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल”, असं त्यांनी नमूद केलं.

Sakinaka Rape Case : “आम्ही भाषणाच्या पलिकडे काही करू शकलो नाही, ही हार आहे आमची”, चित्रा वाघ यांना भावना अनावर!

‘सामना’मधून टीकास्त्र

साकीनाका भागात महिलेवर अमानुष लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक असे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झालेले असतानाच शिवसेनेने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कठुआ व हाथरस प्रकरणाची आठवण करुन देत विरोधी पक्षाला महाराष्ट्रामध्ये कायद्याचेच राज्य असल्याचं सांगत नराधमावर कठोर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे साकीनाकाप्रकरणी डोळय़ांत अश्रू यावेत ही मनाची संवेदनशीलता आहे, पण नक्राश्रू ओघळू लागले की, भीती वाटते, प्रकरणाचे गांभीर्य नष्ट होते, असं म्हणत या प्रकरणामध्ये विरोधी पक्षाने राजकारण करु नये असं ‘सामना’च्या अग्रलेखातून सूचित करण्यात आलं आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरण : “कायद्याचा धाक नाही असे म्हणायचे असेल तर…”; शिवसेनेनं भाजपाला करुन दिली ‘कठुआ’, ‘हाथरस’ची आठवण

चित्रा वाघ यांचं थेट राज्यपालांना पत्र

दरम्यान, चित्रा वाघ यांनी राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांसंदर्भात आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना विनंती करणारं एक पत्र दिलं आहे. त्यामध्ये अॅट्रॉसिटीसारख्या गुन्ह्यांसाठी असणाऱ्या शिक्षेप्रमाणेच महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील सुनावणी, शिक्षा आणि नियम लागू करण्यात यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.