प्रभाकर शिंदे यांची नियुक्ती करण्याची महापौरांकडे मागणी

मुंबई : मुंबई महापालिकेमध्ये पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून भूमिका बजावताना सत्ताधाऱ्यांना खेटून बसणाऱ्या भाजपने राज्यातील सत्ताबदलानंतर भूमिका बदलली आहे. पालिकेतील संख्याबळाच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने विरोधी पक्षनेतेपदावर दावा करीत शिवसेना आणि काँग्रेसला धक्का दिला आहे. भाजपने नगरसेवक गटाची कार्यकारिणी जाहीर करतानाच पालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर प्रभाकर शिंदे यांची नियुक्ती करण्याची मागणी महापौरांकडे सादर केलेल्या पत्रात केली आहे. त्यामुळे पालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

भाजप, मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि पालिकेतील भाजपचे गटनेते, खासदार मनोज कोटक यांनी गुरुवारी पालिकेतील नगरसेवक गटाची कार्यकारिणी जाहीर केली. पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी प्रभाग क्रमांक १०६ मधील नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची नियुक्ती करण्याचा भाजपने निर्णय घेतला. त्याचबरोबर पालिकेतील भाजपच्या गट नेतेपदी विनोद मिश्रा यांची नियुक्ती केली. त्याचबरोबर उपनेतेपदी नगरसेविका उज्ज्वला मोडक, रिटा मकवाना यांची, तर पालिकेतील गट मुख्य प्रतोदपदी सुनील यादव यांची नियुक्ती करण्यात आली. पालिका गटाचे प्रभारी म्हणून भालचंद्र शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या प्रभाकर शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने प्रभाकर शिंदे यांना मुलुंडमधील प्रभाग क्रमांक १०६ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. शिवसेनेने या प्रभागातील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र शिवसेनेच्या उमेदवाराला धूळ चारून प्रभाकर शिंदे विजयी झाले. पालिकेत दाखल झाल्यानंतर कायम गटनेते मनोज कोटक यांच्या खांद्याला खांदा भिडवून त्यांनी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पालिकेतील गटनेते मनोज कोटक लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर भाजपच्या गटनेतेपदाच्या नियुक्तीवरून तर्कवितर्क केले जात होते. भाजपने गुरुवारी नगरसेवकांची कार्यकारिणी जाहीर करीत या चर्चेला पूर्णविराम दिला. त्याचबरोबर शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने प्रभाकर शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती जाहीर करण्याची मागणी करणारे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना सादर केले. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात गोंधळ उडाला. दरम्यान, हे पत्र सभागृहाच्या पटलावर ठेवायचे की नाही, हा महापौरांचा अधिकार आहे. भाजपला विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवण्यासाठी या अधिकाराचा वापर महापौरांकडून   होण्याचीच अधिक शक्यता आहे. भाजपचे संख्याबळ दुसऱ्या क्रमांकाचे असतानाही पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून बसण्याची भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. मात्र महाआघाडी सरकार स्थापन केल्यानंतर भाजपने भूमिका बदलली आहे. पालिका निवडणुकीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या भाजपने विरोधी पक्षनेतेपद न स्वीकारल्यामुळे काँग्रेसने या पदावर दावा केला होता. अखेर काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडली होती. मात्र आता भाजपने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्यामुळे काँग्रेस कोणती भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

विरोधी पक्षनेता पदाच्या नियुक्तीत पेच

निवडणुकीनंतर सर्वाधिक नगरसेवक असलेल्या पक्षाला पालिकेतील सत्तास्थानी बसण्याचा मान मिळतो. मुंबई महापालिका अधिनियम १८८८ मधील ‘३६ – १ अ’नुसार संख्याबळाच्या तुलनेत उर्वरित पक्षांपैकी सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाच्या गटनेत्याची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली जाते. मात्र भाजपने विरोधी पक्षनेतेपदावर प्रभाकर शिंदे यांची नियुक्ती करण्याची मागणी करताना पालिकेतील गटनेतेपदी विनोद मिश्रा यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. भाजपला प्रभाकर शिंदे यांना विरोधी पक्षनेतेपदी विराजमान करायचे असेल तर त्यांची पालिकेतील पक्षाच्या गटनेतेपदी निवड करावी लागेल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात विधि खात्याचे मत मागविण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.