News Flash

दाढीवाल्या बुवाला घाबरू नका

ठाण्यात विजय संकल्प मेळाव्यात भाजप नेत्यांचे टीकास्त्र

दाढीवाल्या बुवाला घाबरू नका

ठाण्यात विजय संकल्प मेळाव्यात भाजप नेत्यांचे टीकास्त्र

ठाणे महापालिकेत टक्केवारीशिवाय एकाही कामाची फाईल हलत नाही. शिवसेनेची सत्ता असलेली ही महापालिका घोटाळ्यांचा अड्डा बनली आहे. ठाण्यातील ‘दाढीवाल्या’ बुवाला घाबरू नका, असे एकामागोमाग एक प्रहार करत भाजप नेत्यांनी शिवसेनेविरोधात रणशिंग फुंकत एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले.

महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर टीपटॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यात भाजपच्या सर्व प्रमुख वक्त्यांनी शिवसेनेवर टीकेचे आसूड ओढले. टक्केवारीमुक्त कारभारासाठी महापालिकेत कोणत्याही परिस्थितीत कमळ फुलवायचे, असा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ‘ठाणेकरांची भाजपा’ हे गीत तयार केले असून या गाण्याच्या सीडीचे मेळाव्यात अनावरण करण्यात आले. या मेळाव्यास भाजपचे संघटनमंत्री रवी भुसारे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपील पाटील, आमदार संजय केळकर, माधवी नाईक, शहराध्यक्ष संदीप लेले आणि स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांच्यासह इच्छुक उमेदवार व प्रमुख पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

यावेळी भाजपचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी पालकमंत्री एकनाथ िशदे यांचा थेट नामोल्लेख टाळत दाढीवाल्या बुवाला घाबरू नका, असे आवाहन उपस्थितांना केले. लहानपणी मुलांना घाबरविण्यासाठी बुवा येईल, असे सांगितले जायचे. मात्र मोठे झाल्यानंतर हा बुवा खोटा असल्याचे कळून चुकते.  ठाण्यातील दाढीवाला बुवाचाही बागुलबुवा उभा केला गेला असून त्याला घाबरण्याचे अजिबात  कारण नाही, असे यावेळी लेले म्हणाले. २६ जानेवारीला युती तुटली असली तरी ठाण्यात मात्र या आधीच आम्ही युती तोडली होती. त्यामुळेच आम्ही युतीच्या प्रस्तावावर चर्चा केली नव्हती. दिव्यात स्मशानभूमी तसेच रस्ते उभारणीसाठी निधी खर्च करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी स्मशानभूमी झाली नाही आणि रस्त्यांची अवस्था फारच वाईट आहे. यासंदर्भात राज्य शासन आणि आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली आहे. तसेच अशा प्रकारे महापालिकेत अनेक घोटाळे झाले आहेत, असा आरोप संजय केळकर यांनी केला.

‘ठाणेकरांची भाजपा’

गेल्या ठाणे महापालिका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून प्रचारामध्ये ‘शिवसेनेचे ठाणे..ठाण्याची शिवसेना’ या गीताचा वापर करण्यात आला. प्रचारादरम्यान हे गीत चांगलेच गाजले आणि शिवसैनिकही या गीताने भारावून गेले. त्यास टक्कर देण्यासाठी भाजपनेही महापालिका निवडणुकीसाठी ‘ठाणेकरांची भाजपा’ हे गीत तयार केले आहे. या गीताच्या सिडीचे मेळाव्यामध्ये अनावरण करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2017 1:51 am

Web Title: bjp comment on shiv sena 2
Next Stories
1 मुंबई पालिकेतील कंत्राटदार भाजपचेच
2 साहित्य क्रांती करू शकते
3 पालिकेतील विरोधी पक्षनेता शिवसेनेत
Just Now!
X