शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आखलेल्या निकषानुसार महापौर निधीचे वाटप करण्यात आल्याचा गौप्यस्फोट करणाऱ्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्याविरोधात काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत टीका करीत गोंधळ घातला. बैठक आटोपल्यानंतर महापौर दालनाबाहेर विरोधकांनी ठिय्या आंदोलन केले आणि त्यानंतर पालिका मुख्यालयातील प्रत्येक विभागात महापौर आणि शिवसेनेविरुद्ध घोषणाबाजी करीत विरोधकांनी मोर्चा काढला होता.
आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पाला सभागृहात मंजूर देण्यापूर्वी महापौरांना प्रशासनाकडून महापौर निधी दिला जातो. यंदा महापौर स्नेहल आंबेकर यांना ५० कोटी रुपये महापौर निधी उपलब्ध करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून विरोधी पक्षाला कमी निधीवाटप करण्यात आल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि समाजवादी पार्टीचे नगरसेवक संतप्त झाले असून त्याचे पडसाद बुधवारच्या स्थायी समितीच्या या वर्षांतील अखेरच्या बैठकीत उमटले. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसार निधी वाटप झाले आहे का, महापौर नेमके कोण आहेत, विरोधी पक्षावर अन्याय करण्यात आला आहे, पैसे कुठे गेले, निधी वाटपात उद्धव ठाकरे यांचा हात आहे का, अशा प्रश्नांची सरबत्ती करीत विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी सत्ताधाऱ्यांना बेजार केले.

भाजपचा उद्धव ठाकरे यांना टोला
* अर्थसंकल्प मंजूर करताना प्रशासनाकडून मिळणारा निधीवर महापौर आणि सभागृहाचा अधिकार असतो. त्यातून मुंबईत विकासकामे केली जातात. कोणाला किती निधी द्यायचा हा महापौरांचाच अधिकार आहे.
* महापौरपद हे सांविधानिक उच्च पद आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने महापौरांच्या अधिकारात हस्तक्षेप करणे योग्य नाही, असा टोला भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख न करता हाणला.
* निधीवाटपाबाबत महापौरांशी संपर्क साधला होता का, असा प्रश्न विचारला असता कोटक म्हणाले की वर्षभर महापौरांशी मोबाइलवर बोललेलो नाही.