भाजपकडून महाविकास आघाडीत विसंवादाचा प्रयत्न; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी या घटक पक्षांचा विरोध झुगारून भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देतानाच, केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा सुधारित नागरिकत्व कायदा (सीसीए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची (एनपीआर)च्या अंमलबजावणीस पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव करीत भाजपने रविवारी महाविकास आघाडीत विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

संपूर्ण कर्जमाफीवरून शेतकऱ्यांची झालेली फसगत, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना तसेच सावरकारांच्या मुद्दय़ावरून राज्य विधिमंडळाच्या उद्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याचे संकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सरकारमध्येच संवाद नसल्याने त्यांनीच चहापानाच्या माध्यमातून तो वाढवावा, असे सांगत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. कामकाज रोखण्यापेक्षा जनेतेचे अधिकाधिक प्रश्न सभागृहात मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील. मात्र गेल्या तीन-साडेतीन महिन्यांच्या काळात सरकारला सूर गवसलेला नसून कामाची दिशाही ठरलेली नाही. एकूणच हे गोंधळलेले सरकार असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

राज्यातील विविध योजनांना स्थगिती देण्याचा सपाटा सरकारने लावला असून जलयुक्त शिवार योजनेत कोणताही घोटाळा नसल्याचे उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणत्याही योजनेची खुशाल चौकशी करावी असे आव्हानही फडणवीस यांनी दिले. तसेच येत्या २६ फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीला विधिमंडळात त्यांचा गौरव झाला पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात प्रस्ताव आणावा अशी मागणी करीत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसने आपल्या शिदोरी या मुखपत्रातून सावरकरांची बदनामी केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचाही अवमान मुख्यमंत्र्यांना कसा सहन होतो. युतीसाठी विचार सोडणे कितपत योग्य याचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असा टोलाही फडणवीस यांनी हाणला.

‘सरकारला अपयश’

कर्जमाफीबाबतही शेतकऱ्यांची फसवणूक  झाली असून धान खरेदीत मोठा भ्रष्टाचार होत आहे. अधिवेशनात हे मुद्दे उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारने पोलीस दलामध्ये राजकारण सुरू केले असून त्यामुळे पोलिसांचे मनोबल खचत आहे. त्यातच महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब असून त्याबाबत सरकारची कोंडी करण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे.

पवारांवर टीका : फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भीमा- कोरेगाव प्रकरणावरून दलित समाजात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. भीमा- कोरेगाव आणि एल्गार परिषद वेगळे नसून शहरी माओवाद हा केवळ राज्यापुरता मर्यादित नसून तो अन्य राज्यांतही पसरला आहे. त्यामुळे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानेही आतापर्यंत पोलिसांच्या तपासावर आणि कागदपत्रांवर विश्वास ठेवला आहे. शरद पवार यांनी मात्र हे सर्व हिंदुत्ववाद्यांनी केल्याचा आरोप केला होता. आतापर्यंतच्या तपासातून त्यांच्या भूमिकेला छेद जात असल्यामुळेच पवारांचा सगळा आटापीटा सुरू असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. तसेच धर्माच्या आधारावर मुस्लीम समाजात आरक्षण देण्यास भाजपचा विरोध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.