एकहाती वर्चस्व निर्माण करण्यासाठी मुंबई अध्यक्षांची आतापासून मोर्चेबांधणी
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापालिकेच्या चाव्या कोण बळकावणार, याचा फैसला करणारी निवडणूक वर्षभरात येऊ घातली असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, यातही भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे शहर अध्यक्ष आघाडीवर आहेत. एकीकडे मुंबईत एकहाती वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपची व्यूहरचना सुरू आहे. तर दुसरीकडे, भाजप-शिवसेनेच्या भांडणातून मिळेल तितका फायदा घेण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आशीष शेलार (भाजप), संजय निरुपम(काँग्रेस) आणि सचिन अहिर (राष्ट्रवादी) या तिन्ही शहर अध्यक्षांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेतील गैरकारभार पथ्यावर
मोदी लाटेत मुंबईत भाजपला चांगले यश मिळाले. तेव्हापासून आशीष शेलार यांचा आत्मविश्वास बळावला. मित्र पक्ष शिवसेनेला बदनाम केल्याशिवाय लक्ष्य गाठता येणार नाही हे लक्षात येताच शेलार शिवसेनेच्या हात धुऊन मागे लागले आहेत. शेलार एकीकडे शिवसेनेवर कुरघोडी करतात, पण दुसरीकडे भाजप महापालिकेत शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसते. सुधार समितीसारख्या महत्त्वाच्या समितीचे अध्यक्षपद भाजपकडेच आहे. रस्तेबांधणी, नालेसफाई यावरून झालेल्या गैरव्यवहारांवरून शेलार शिवसेनेवर खापर फोडतात. पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सत्तेतून हद्दपार करायचे हा विडा शेलार यांनी उचलला आहे.

आव्हाने:
* शिवसेनेच्या धर्तीवर कार्यकर्त्यांचे संघटन भाजपकडे नाही. सध्या राज्याची सत्ता असल्याने भाजपकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. पण तळागळात किंवा बूथपर्यंत जाऊ शकतील एवढे सर्व प्रभागांमध्ये भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा संच तेवढा दिसत नाही.
* विधानसभेत सर्वाधिक १५ आमदार मुंबईतून निवडून आले असले तरी महापालिकेला हा कल राहीलच असे नाही. याशिवाय मुंबईचा भावनिक मुद्दा शिवसेनेकडून नेहमीप्रमाणे केला जाऊ शकतो.
* मराठी मतदारांप्रमाणेच उत्तर भारतीय, गुजराती, जैन यांची मोट बांधण्याचे आव्हान शेलार यांच्यापुढे आहे.

मतविभाजनावर भिस्त
भाजप आणि शिवसेनेतील भांडणे तसेच शिवसेना व मनसेत होणारे मतविभाजन या सर्वाचा फायदा घेण्याचा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांचा प्रयत्न आहे. निरुपम यांनी मुंबईत काँग्रेसचे संघटन वाढविण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार किंवा विविध मुद्दे हाती घेऊन निरुपम लढत असतात. पक्षात जान आणण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. महापालिकेच्या राजकारणात भाजपला फारसा विरोध न करता शिवसेनेला त्यांनी लक्ष्य केले आहे. पूर्वी शिवसेनेत असल्याने शिवसेनेच्या धर्तीवर प्रभागनिहाय काम करण्यावर त्यांनी भर दिला आहे. शिवसेनेच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवून निरुपम हे शिवसेनेवर निशाणा साधत असतात. भाजप आणि शिवसेनेतील भांडणाचा फायदा उठविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

आव्हाने:
* निरुपम आक्रमक भूमिका घेऊन उतरले असले तरी पक्षांतर्गत वादविवाद ही त्यांच्यापुढे मोठी समस्या आहे. मुंबई काँग्रेसमध्ये गुरुदास कामत यांचा गट प्रभावी असून, कामत आणि निरुपम यांच्यातून सध्या विस्तवही जात नाही.
* २०१२च्या निवडणुकीत मुंबई काँग्रेसचे नेतृत्व कृपाशंकर सिंह यांच्याकडे होते व तेव्हा मराठी भाषिकांनी काँग्रेसला दूरच ठेवले होते. निरुपम यांच्याकडे अध्यक्षपद असल्याने मराठी मतदार काँग्रेसला कितपत साथ देतील, हा पक्षात सवाल केला जातो.

ताकद मर्यादित
आशीष शेलार वा संजय निरुपम यांच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांची शहरात ताकद मर्यादित आहे. मुळात मुंबईत राष्ट्रवादी अद्याप बाळसेच धरू शकलेले नाही. पक्ष स्थापनेनंतर तीन महापालिकांना सामोरे जाताना कसाबसा दुहेरी आकडा गाठणे शक्य झाले. यंदा मुंबईत चांगले यश मिळवायचे या उद्देशाने अहिर रिंगणात उतरले आहेत. गेल्याच आठवडय़ात त्यांनी मोर्चा काढला होता. महापालिकेतील विविध मुद्दे हाती घेऊन ते लढत असतात. महपालिकेची सत्ता मिळणार नाही हे नक्की असले तरी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे अहिर यांचे उद्दिष्ट आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp congress ncp target shiv sena ahead of mumbai municipal corporation elections
First published on: 21-04-2016 at 03:50 IST