डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्रुपीकरण केलेले छायाचित्र समाजमाध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी भाजप नगरसेविका सुरेखा पाटील यांना सोमवारी अटक करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अंकुश जाधव यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.
सुरेखा पाटील या कांदिवली येथील वॉर्ड क्रमांक २७ मधून नगरसेविका आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतानाची छायाचित्रे पाटील यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून रविवारी प्रसारित केली होती. यातील काही छायाचित्रे ‘मॉर्फ’करून आंबेडकरांच्या प्रतिमेचे विद्रुपीकरण करण्यात आले होते. याबाबत आक्षेप घेण्यात आल्यानंतर पाटील यांनी ही छायाचित्रे समाजमाध्यमातून काढून टाकली. दरम्यान स्थानिक रहिवाशांनी समतानगर पोलीस ठाण्यावर दाखल होऊन कारवाईची मागणी केली होती. न्यायालयाने त्यांना ९ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पाटील यांनी आंबेडकर यांच्या प्रतिमेवर अनवधानाने काही खुणा दाखविण्यात आल्याबद्दल माफी मागितली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 12:28 am