दर शुक्रवारी खादीचे कपडे परिधान करा; भाजप नगरसेवकांची ठरावाची सूचना
महात्म गांधी यांनी स्वच्छतेला दिलेले महत्त्व लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची हाक दिल्यानंतर आता मुंबईमधील माजी उपमहापौर आणि भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकाने सरकारी, पालिका अधिकारी – कर्मचारी, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी दर शुक्रवारी खादीचे कपडे परिधान करण्याचा आग्रह धरला आहे. याबाबतची त्यांची ठरावाची सूचना लवकरच पालिका सभागृहात चर्चेला येणार आहे. यामुळे भाजपचे खादी, पर्यायाने गांधी प्रेम उफाळून आल्याची टिका विरोधी पक्षाकडून होऊ लागली आहे.
चरखा आणि खादी ही स्वदेशी भावना जागृत करणारी प्रतिके मानली जातात. एकेकाळी भारतात खादी हे राष्ट्रीय प्रतिक बनले होते.
त्यामुळे महात्म गांधीचे तत्वज्ञान प्रत्यक्षात अंमलात आणण्याची आवश्यकता आहे, असे मत माजी महापौर आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. राम बारोट यांनी व्यक्त केले.
त्यासाठी सरकारी, पालिका कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांनी दर शुक्रवारी खादीचे कपडे परिधान करावे, अशी मागणी डॉ. बारोट यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका सभागृहात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या मागणीमुळे भाजप नेत्यांपुढेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आताच गाधीजींची आठवण कशी?
राज्य सरकार आणि पालिकेचे कर्मचारी, तसेच शालेय विद्यार्थ्यांना दर शुक्रवारी खादीचे कपडे परिधान करणे बंधनकारक करण्यासाठी ‘खादी दिन’ जाहीर करावा लागेल आणि ही बाब केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारितील आहे. त्यासाठी पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडून उपयोग नाही. ही ठरावाची सूचना पालिका सभागृहात मंजूर झाली, तरी त्याला सरकारच्या मंजुरीची गरज भासेल. मात्र भाजप नगरसेवकांना आताच गाधीजींची आठवण कशी काय झाली, असा सवाल विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केला आहे.