मुंबई भाजप अध्यक्षांची सूचना; छोटय़ा नाल्यांची कामे रखडल्याची तक्रार

छोटय़ा नाल्यांच्या सफाईसाठी पोकलेन मशीन उपलब्ध होत नसल्यामुळे या नाल्यांची सफाई रखडली असून भाजपच्या नगरसेवकांनी नालेसफाईच्या कामांवर बारीक लक्ष ठेवावे, अशी सूचना मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी गुरुवारी केली.

वांद्रे विधानसभा मतदारसंघातील नाल्यांची आशीष शेलार यांनी गुरुवारी पाहणी केली. उपमहापौर अलका केरकर आणि भाजपचे नगरसेवक या वेळी उपस्थित होते. येथील मेन अ‍ॅव्हेन्यू, नॉर्थ अ‍ॅव्हेन्यू, साऊथ अ‍ॅव्हेन्यू, पीएनटी, एसएनडीटी या मोठय़ा नाल्यांसह छोटे नाले, गझदर बांध येथे उभारण्यात येत असलेल्या उदंचन केंद्राची पाहणी केली.

साऊथ अ‍ॅव्हेन्यू, पीएनटी या नाल्याच्या सफाईच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही ती तात्काळ करण्यात यावी. गझदर बांध येथे उभारण्यात येणाऱ्या उदंचन केंद्राच्या कामासाठी समुद्राचा प्रवाह अडविणारी बंड वॉल बांधण्यात आली आहे. तेथे पाथमुख बांधण्याचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करावे अन्यथा नाल्यातून येणारा पाण्याचा निचरा होऊ शकणार नाही. परिणामी, आजूबाजूंचा परिसर जलमय होण्याची शक्यता आहे. गझदर बांध परिसरातील झोपडपट्टीमध्ये दत्तक वस्ती योजनेतून छोटी गटारे साफ करण्यात येत आहेत. छोटय़ा नाल्यांच्या सफाईसाठी पोकलेन मशीन उपलब्ध नसल्यामुळे त्यांची सफाई रखडण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाने तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे करण्यात येणार आहे, असे आशीष शेलार यांनी सांगितले.