भाजपाचे नगरसेवक योगीराज दाभाडकर यांनी मुंबईतील एका उड्डाणपुलाला दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचं नाव द्यावं अशी मागणी केली आहे. मुंबईच्या महापौरांना एक पत्र लिहून त्यांनी अशी मागणी केली आहे. अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्पेक्स येथील उड्डाणपुलाला श्रीदेवीचं नाव देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे.

योगीराज दाभाडकर हे क प्रभाग समितीचे चेअरमनही आहेत. लोखंडवाला कॉम्पेक्स येथील सेलिब्रेश क्लबजवळील उड्डाणपुलाला अभिनेत्री श्रीदेवी उड्डाणपुल असं नाव देण्याची त्यांनी मागणी केली आहे.

काय म्हटलंय पत्रात –
श्रीदेवीनी त्यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीची सुरुवात जुली चित्रपटात बालकलाकार म्हणून केली. अनेक प्रसीद्ध हिंदी चित्रपटांशिवाय त्यांनी कन्नड, मल्याळी आणि तामिळ चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल म्हणून २०१३ मध्ये केंद्र सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला. त्यामुळे देशातल्या दिग्गज अभिनेत्रीची आठवण म्हणून उड्डाणपुलाला त्यांचं नाव द्यावं अशी नगरसेवकाची मागणी आहे. सोमवारी नागरी गट नेत्यांच्या बैठकीत दाभाडकरांच्या पत्रावर चर्चाही झाली. त्यानंतर अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव महापालिकेकडे पाठवण्यात आला आहे. जर प्रस्ताव मंजुर झाला तर लवकरच उड्डाणपुलाचं नाव बदललं जाऊ शकतं.
यावर्षी २४ फेब्रुवारी रोजी दुबईच्या एका हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू झाला.