शिक्षण समिती अध्यक्ष मत मांडण्यासाठी संधीच देत नसल्याची कुरकुर केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांकडूनच नव्हे, तर सत्ताधारी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडूनही करण्यात येत होती. मात्र बोलण्यास संधी नाकारणे, आपले म्हणणे फेटाळून लावणे असे प्रकार घडल्यामुळे भाजप सदस्यांनीही शिक्षण समिती अध्यक्षांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकविला असून उभयतांमधील वाद विकोपाला गेल्यामुळे भाजप नगरसेविकेवर शिक्षण समिती सदस्यत्व गमविण्याची वेळ आली आहे. या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला आहे.

शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये पालिका शाळांबाबतचे अनेक प्रश्न मांडले जातात. खासगी अनुदानित शाळांच्या वर्गतुकडय़ा वाढविणे, नव्या शाळांना अनुदान देणे, पालिका शाळांची सुरक्षितता, सुविधा, शिक्षकांचे प्रश्न अशा अनेक मुद्दय़ांवर या बैठकीमध्ये सदस्य आपापली मते मांडतात. शाळांमध्ये नसलेल्या सुविधा उपलब्ध करण्यास समिती सदस्य अध्यक्षांच्या मदतीने प्रशासनाला भाग पाडतात. त्यामुळे पालिका शाळा, विद्यार्थी, शिक्षक, खासगी अनुदानित शाळांच्या दृष्टीने शिक्षण समिती महत्त्वाची मानली जाते. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्याला प्रश्न मांडण्यास, प्रस्तावांवर चर्चा करण्यास शिक्षण समिती अध्यक्ष रितू तावडे संधी नाकारत असल्याबद्दल भाजप नगरसेविका ज्योती अळवणी संतप्त झाल्या होत्या. शिक्षण समितीच्या बैठकांमध्ये तशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली होती. मात्र परिस्थितीत कोणताच बदल झाला नाही. अखेर ज्योती अळवणी यांनी समितीच्या बैठकीस अनुपस्थित राहण्यास सुरुवात केली. नियमानुसार सलग तीन बैठका अनुपस्थित राहिल्यानंतर समितीचे सदस्यपद रद्द होते. तीन बैठकींना अनुपस्थित राहिल्यामुळे पालिकेच्या चिटणीस विभागाने ज्योती अळवणी यांना पत्र पाठवून बैठकींना का उपस्थित राहू शकल्या नाहीत याची विचारणा केली होती. परंतु या पत्राचे उत्तरही त्यांनी अद्याप दिलेले नाही. त्यामुळे चिटणीस विभागाला आता नियमानुसार ज्योती अळवणी यांचे शिक्षण समिती सदस्यपद रद्द करावे लागणार आहे.

रितू तावडे आणि ज्योती अळवणी यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. वरिष्ठ नेत्यांनी उभयतांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यातून तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आता ज्योती अळवणी यांचे शिक्षण समिती सदस्यपद रद्द होऊन पक्षातील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भाजप सदस्यानेच अध्यक्षांना घरचा अहेर दिल्यामुळे विरोधक आणि शिवसेना सदस्यांना आयतेच कोलीत हातात मिळणार आहे. त्यामुळे हा वाद मिटावा यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आता अध्यक्ष नमते घेणार की सदस्य याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.