भाजप नगरसेवकांनी पालिका मुख्यालयातील महापौरांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. नरेंद्र मोदी यांना हिटलर संबोधणाऱ्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी भाजप नगरसेवकांनी दणका दिला. आपण असे बोललोच नाही, असे सांगत या प्रकरणातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न महापौर करीत होत्या. मात्र भाजप नगरसेवकांच्या मागणीनुसार लेखी स्पष्टीकरण देण्याची कबुली दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
शिवसेना आणि भाजपची राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्ता आहे. प्रथम नागरिक असलेल्या स्नेहल आंबेकर यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला हिटलर म्हणून संबोधल्याबद्दल भाजप नगरसेवक संतप्त झाल होते. याबद्दल महापौरांचा निषेध करण्यासाठी भाजप नगरसेवकांची मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास पालिका मुख्यालयात तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांना हिटलर म्हटल्याबद्दल माफी मागावी, तसे त्यांनी म्हटले नसेल तर त्याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली. या बैठकीनंतर कोटक आणि सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवक घोषणाबाजी करीत महापौरांच्या दालनाबाहेर ठिय्या दिला. आपण पंतप्रधानांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य केलेले नाही, असे स्पष्टीकरण स्नेहल आंबेकर यांनी भाजप नगरसेवकांना दिले. मात्र नगरसेवकांचे समाधान झाले नाही.